- आ. लांडगे, महापौर जाधव व आयुक्तांमध्ये टीपी स्कीम वगळण्याबाबत सकारात्मक चर्चा ?
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ नोव्हेंबर २०१९) :- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने समाविष्ट गावांतील बारा भागांमध्ये नगर नियोजन (टीपी) स्किमनुसार विकास करण्याचे नियोजित आहे. मात्र, शहराच्या प्रभाग क्रमांक दोनमधील बोऱ्हाडेवाडी, जाधववाडी आणि चिखलीमध्ये टीपी स्कीम राबविण्यास महापौर राहुल जाधव यांनी शेतकऱ्यांच्या वतीने विरोध दर्शविला आहे. त्यांनी योजनेतून वरील भाग वगळण्याची सूचना प्रशासनाला केली आहे. महापालिकेने टीपी स्कीम राबविण्याचे धोरण स्वीकारले आहे.
त्या अनुषंगाने भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे, महापौर राहुल जाधव व महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यात प्रभाग क्रमांक दोनमधील बोऱ्हाडेवाडी, जाधववाडी आणि चिखलीमध्ये टीपी स्कीमचा विषय वगळण्याबाबत नुकतीच सकारात्मक चर्चा झाली असल्याची महिती मिळत आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या येत्या २० नोव्हेंबर रोजीच्या सर्वसाधरण सभेत प्रभाग क्रमांक दोनमधील बोऱ्हाडेवाडी, जाधववाडी आणि चिखलीमध्ये टीपी स्कीमचा विषय उपसूचनेद्वारे वगळण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
योजनेच्या अंतर्गत थेरगाव, चिखली, चिंचवड, चऱ्होली, रावेत, किवळे, पुनावळे, ताथवडे, मामुर्डी, डुडुळगाव, मोशी, बोऱ्हाडेवाडी या बारा भागांची निवड करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने नागरिकांकडून सूचना, हरकतीही मागविण्यात येणार आहेत. परंतु, कार्यवाहीच्या प्रारंभीच बोऱ्हाडेवाडी, जाधववाडी आणि चिखली या गावांतील टीपी स्कीमला शेतकऱ्यांकडून विरोध होऊ लागला आहे. त्यामुळे शहरातील इतर भागाकडूनही महापालिकेच्या टीपी स्कीमला विरोध दर्शविला जाऊ शकतो.















