न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ नोव्हेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड शहराची लोकसंख्या जवळपास २५ लाखांच्या घरात आहे. सध्या पावसाळा मोसमात शहराला पाणीपुरवठा करणारे धरण तुडुंब भरले असतानादेखील पिंपरी चिंचवड महापालिकेची प्रशासकीय पाणीपुरवठा यंत्रणा शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यास कुचकामी ठरली आहे. महापालिकेने रावेत बंधा-यातून पुनावळे गावच्या बाजुला पंपींग करून जलशुध्दीकरण केंद्र उभारल्यास या भागातील पाणी प्रश्न कायमस्वरुपी सुटेल व भविष्यात वाढणा-या लोकसंख्येला देखील त्याचा फायदा होईल, असा सल्ला महापालिका गटनेता व नगरसेवक राहुल कलाटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात कलाटे यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात सध्या ४८० ते ५०० एम. एल. डी. इतके शहरासाठी पाणी उचलले जाते. आज शहरातील लोकसंख्या सुमारे २५ लाख इतकी आहे. त्यानुसार २५ लाख लोकांना ३३७ एम. एल. डी. पाण्याची गरज आहे. परंतु, लिकेज किंवा आपल्या शहरामधील वितरणातील त्रुटीमुळे शहरात धरणे भरलेली असतानादेखील पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात आहे. मी, मागील ब-याच महिन्यांपासुन मनपा सर्वसाधारण सभेतदेखील ही बाब आपल्यासमोर मांडली होती की, आपण पुनावळे येथे जलशुध्दीकरण प्रकल्प करावा कारण आपण नेहमी म्हणता की वाकड, सौदागर, थेरगाव, रहाटणी, काळेवाडी, सांगवी हा परिसर वितरण व्यवस्थेचा शेवटचा भाग असल्यामुळे त्या ठिकाणी पाणी टंचाईची परिस्थिती आहे. त्यामुळे जर आपण मी सुचविल्याप्रमाणे रावेत बंधा-यातून पुनावळे गावच्या बाजुला पंपींग करून जलशुध्दीकरण केंद्र उभारल्यास या भागातील पाणी प्रश्न कायमस्वरुपी सुटेल व भविष्यात वाढणा-या लोकसंख्येला देखील त्याचा फायदा होईल,
आपण अशा प्रकारे पाणी वाटपाचे ठोक स्वरुपात विकेंद्रीकरण केल्यास आज शहरात आपण रावेत बंधा-यातून योग्य प्रमाणात पाणी उचलून देखील पाण्याची टंचाई जाणवते, त्या परिस्थितीत निश्चित सुधारणा होईल. तसेच मागील अडीच वर्षापासून आपण शेवटच्या भागासाठी १००० मि. मी. ची जलवाहिनी करण्याचा प्रयत्न करत आहात परंतु, त्यानादेखील आजपर्यत प्रगती झालेली दिसून येत नाही. तरी, आपण लवकरात लवकर योग्य नियोजन व समान पाणीपुरवठा करावा व लोकांची पाणी समस्येतून सुटका करावी, अन्यथा याबाबत लोक सहभागातून आंदोलन करण्यात येईल राहुल कलाटे















