- वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा व आस्थेने केली विचारपूस…!
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ नोव्हेंबर २०१९) :- शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीच्या साथीने ‘महासेनाआघाडी’ स्थापन करण्यासाठी जुळवाजुळव सुरु केली आहे. महाराष्ट्रातील या सत्तेच्या सारीपाटावरचा एक महत्त्वाचा मोहरा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, ते शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा आज (१५ नोव्हेंबर) रोजी वाढदिवस. संजय राऊत यांनी वयाची ५८ वर्ष पूर्ण केली आहेत.
या निमित्त शिवसेनेचे भोसरी व खेड सहसंपर्कप्रमुख व शिवसेना कामगार नेते इरफान सय्यद यांनी खासदार संजय राऊत यांची मुंबईत भेट घेतली व त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच राऊत यांची अँजिओप्लास्टी झाली आहे. त्यामुळे त्यांच्या तब्येतीची विचारपूसही सय्यद यांनी आस्थेने केली.

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना इरफान सय्यद म्हणाले की, शिवसेनेचे खासदार, शिवसेनेचे प्रवक्ते, शिवसेनेच्या मुखपत्राचे संपादक अशा अनेक भूमिका निभावणारे संजय राऊत कोणत्याही आव्हानांना हसतमुख सामोरे जात, आपली कर्तव्य प्रामाणिकपणे निभावतात. पक्षाच्या भूमिकांसाठी ते ठाम राहिले आहेत. संजय राऊत हे आळीपाळीने विद्धान आणि पहेलवान या दोन्ही भूमिका नेटकेपणाने बजावतात. म्हणूनच राजकारणात राऊतांच्या प्रत्येक शब्दाला वजन आहे.
राऊतांच्या भूमिकेबाबत, त्यांच्या विधानांबाबत विरोधकांमध्ये आणि शिवसेनेतही दुमत आहे. मात्र त्यांच्या निष्ठेवर शंका घेणारा एकही नाही. सामनातलं प्रत्येक वाक्य आणि तोंडातला प्रत्येक शब्द ते शिवसेनेसाठी लिहितात आणि शिवसेनेसाठीच मांडतात, हे नाकारुन चालत नाही.















