- भाजपमध्ये धाकधूक; महाशिवघाडीचे पडसाद थेट महापालिकेत
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ नोव्हेंबर २०१९) :- राज्यात महाशिवआघाडीचे सरकार येण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेची महापौर निवड चुरशीची होणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात असून, त्यातच आता राष्ट्रवादीने महापौर व उप-महापौर पदासाठी इच्छुकांकडून अर्ज मागितले आहेत. महापौर व उप-महापौर पदासाठी इच्छुकांनी उद्या रविवारी (दि. १७) रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत महापालिका विरोधी पक्षनेत्यांकडे अर्ज जमा करण्याचे आवाहन शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी केले आहे.
भाजपात गेलेल्यांना फोडण्यासाठी राष्ट्रवादीकडून व्यूहरचना सुरू झाली आहे. नगरसेवक फुटू नयेत, यासाठी भाजपाने प्रयत्न सुरू केले आहेत. महापालिकेतील १२८ नगरसेवकांपैकी भाजपाचे ७७, राष्ट्रवादी काँग्रेसचे ३६, शिवसेनेचे नऊ, अपक्ष पाच, मनसे एक असे पक्षीय बलाबल आहे. राज्यात सत्तांतर झाल्यास अजित पवार महापालिकेच्या राजकारणात लक्ष घालणार, त्यामुळे (दि. २१) रोजी होणाऱ्या महापौर निवडीत भाजपाचे सदस्य फोडाफोडी करण्याची व्यूहरचना आखली जात आहे.
महापौर पदाच्या बहुमतासाठी ६५ मतांची आवश्यता आहे. भाजपाकडे बारा नगरसेवक अधिक आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि मनसे अपक्ष एकत्र आल्यास हे संख्याबळ ५० सदस्यांचे होते. केवळ १५ नगरसेवकांची बेरीज राष्ट्रवादीला करावी लागणार आहे. महासभेत १५ नगरसेवक अनुपस्थित राहिले तरी राष्ट्रवादीला फायदा होणार आहे. यासाठी काहींनी आतापासूनच पक्षश्रेष्ठींची भेट घेण्यास सुरुवात केली आहे.












