न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हेंबर २०१९) :- ऑटोरिक्षा बॅचसाठी अनेक कागदपत्रे लागतात. त्यापैकी बनावट रहिवासी दाखले आरोपींनी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी-चिंचवड येथे सादर केले. कागदपत्रांची पडताळणी करत असताना परिवहन विभागाच्या अधिका-यांच्या ही बाब लक्षात आली. १९ जानेवारी २०१९ ते ७ फेब्रुवारी २०१९ या कालावधीत हा प्रकार घडला. त्यानुसार ही बनावट कागदपत्रे सादर करणा-या एकूण २७ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने संबंधित एजंटची माहिती काढली. त्यांची नावे आणि त्यांच्या थांबण्याची ठिकाणे, कार्यालयात येण्याची-जाण्याची वेळ, परवान्याचे कागदपत्र, त्यांच्या कामकाजाची वेळ, त्यांचे सहकारी याबाबतची माहिती शोधून काढली. या माहितीच्या आधारे गुन्हे शाखा एकच्या पोलिसांनी सुरुवातीला तीन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सापडलेल्या कागदपत्रांची चौकशी करून आणखी चार जणांना ताब्यात घेतले. सात जणांकडून बनावट सही व शिक्क्याची वेगवेगळ्या मजकुराची एकूण ८८ बनावट चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्रे जप्त केली. तसेच काही शाळांचे शाळा सोडल्याचे कोरे दाखले, मुख्याध्यापकांच्या सहीचे कोरे दाखले, काही परिपूर्ण सही शिक्क्याचे दाखले, तहसीलदारांचे रहिवासी प्रमाणपत्र आढळून आले. पोलिसांनी कसून चौकशी करत आरोपींकडून चार वाहने, संगणक, लॅपटॉप, प्रिंटर, स्कॅनर असा एकूण १८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
महम्मद अली हबीब अली सय्यद (रा. ओटास्कीम, निगडी), शिवाजी शंकर डोलारे (रा. देहूरोड), मुबारक महेबूब शेख (रा. ओटास्कीम, निगडी) आणि अन्य २४ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सुबोध मेडसीकर यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.















