न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ नोव्हेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरावर लादलेली पाणीकपात ही पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणी कपातीच्या नावाखाली महापालिकेचा नियोजनशून्य कारभार असल्याची टीका पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष तथा महापालिकेचे गटनेते सचिन चिखले यांनी केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात चिखले यांनी म्हटले आहे की, आयुक्त व महापौर यांनी सर्वपक्षीय गटनेत्यांची आज मंगळवारी (दि. १९) रोजी पाणी कपातीच्या विषयावर चर्चेसाठी बैठक बोलवली होती. यामध्ये पुन्हा एकदा शहराला पाणी व्यवस्थित पुरवठा होत नसल्याकारणामुळे आयुक्तांनी पुन्हा एकदा शहरातील नागरिकांना वेठीस धरले. या बैठकीत शहरातील पाणीपुरवठा एक दिवस आड करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला.
यावर्षी चांगला पाऊस होऊनसुद्धा व पवना धरण पूर्णपणे भरलेले असतानासुद्धा पाणी कपात करणे हे आयुक्तांचे आडमुठे धोरण आहे. एक दिवसाआड पाणीपुरवठा करणे याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पूर्णपणे विरोध असून शहरातील सर्व नागरिकांना व्यवस्थितपणे पाणीपुरवठा देणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. मनसेच्या वतीने पाणी कपातीच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असे या पत्रकात चिखले यांनी म्हटले आहे.















