- २० अश्व शक्ती वीज मीटर्सच्या वाटपात सुसूत्रता आणावी
- महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समिती सदस्य संतोष सौंदणकर यांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ नोव्हेंबर २०१९) :- औद्योगिक वापरासाठी लागणारे २० अश्व शक्ती असणारे वीज मीटर्स पुणे विभागात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. असे असताना देखील या मीटर्सच्या वाटपासाठी प्रकाशगड, मुंबई या वरिष्ठ कार्यालयाने परवानगी दिल्याशिवाय सदर मीटर्सचे वाटप येथील विभाग तसेच उपविभागीय कार्यालयांना संबंधित ग्राहकांस करता येत नाहीत. याबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समिती सदस्य व चिंचवड विधानसभेचे शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी म.रा.वि.वि.कं.मर्या., प्रकाशगड, मुंबईचे अध्यक्ष तथा मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांच्याकडे औद्योगिक वापरासाठी लागणारे २० अश्व शक्तीचे वीज मीटर्स च्या वाटपात सुसूत्रता आणावी अशी मागणी पत्राद्वारे केली आहे.
या पत्रात सौंदणकर यांनी म्हटले आहे की, औद्योगिक वापरासाठी लागणारे वीज मीटर्स बंद पडल्यास संबंधित आस्थापनांना महावितरणाच्या वरिष्ठ कार्यालयातील अभियंत्याच्या परवानगी शिवाय सदर मीटर्स लावता येत नाहीत. तसेच वाढीव वीज भार एखाद्या ग्राहकास घ्यावयाचा झाल्यास त्यास देखील वरिष्ठ कार्यालयाची परवानगी येत नाही तो पर्यंत मीटर्स बसवू शकत नाही, असे आपले अधिकारी खाजगीत सांगतात. याउलट पुणे परिमंडलातील मुख्य अभियंता मा. सचिन तालेवार सो.,यांनी LT मीटर्स वाटपात संवेदनशीलता दाखवत वीज ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत ते अभिनंदनास पात्रही आहेत.
औद्योगिक वापरासाठीच्या वीज मीटर्सच्या वाटपात सुसूत्रता आणण्यासाठी २० अश्व शक्तीच्या वीज मीटर्स च्या बाबतीत वरिष्ठ कार्यालयाच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती अवघड होत चालली आहे. तसेच बंद पडलेले मीटर्स व वाढीव वीज भाराबाबत वरिष्ठ कार्यालयातील अभियंत्यां ऐवजी स्थानिक मंडलातील अभियंत्यांना याबाबत सूचना केल्यास वीज ग्राहकांचे बंद पडलेले मीटर्स तसेच वाढीव वीज भाराच्या तक्रारींचा निपटारा त्वरेने करता येईल व यामध्ये आपल्या कार्यालयाचा वेळही वाचेल.
आपण वीज ग्राहकांचे हित डोळ्यासमोर ठेवून वरील नमूद मुद्याबाबत स्वतः जातीने लक्ष घालून नवीन योजना आणाव्यात, जेणे करून वीज ग्राहकांना त्रास होणार नाही, असे सौंदणकर यांनी महावितरणाचे अध्यक्ष तथा मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.


















