- रात्रीस खेळ चालून सत्ता मिळत नसते – उद्धव ठाकरे
- आम्ही शरद पवार यांच्या पाठीशी; शपथविधीवेळी अजित पवारांच्या बरोबर असणाऱ्या आमदारांच्या प्रतिक्रिया
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि, २३ नोव्हेंबर २०१९) :- राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज शनिवारी (दि. २३) रोजी सकाळी भाजपबरोबर घरोबा करून राज्यात सत्ता स्थापना केली. मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री पदी अजित पवार यांचा शपथविधी संपन्न झाला. याबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस चे सर्वोसार्वा शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व कॉंग्रेस चे नेते यांनी अजित पवार यांच्या पाठींब्यास विरोध केला आहे. त्याबाबत आज शनिवारी (दि. २३) रोजी मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या बैठकीसाठी शरद पवार, उद्धव ठाकरे, जयंत पाटील, संजय राउत, आदित्य ठाकरे आदी उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले की, हा अनुभव मला नवीन नाही. राष्ट्रवादी-कॉंग्रेस-शिवसेना या तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र बसून सत्तास्थापनेची तयारी केली होती. शिवसेना ५६, राष्ट्रवादी ५४ व कॉंग्रेसचे मिळून एकूण १५६ तर, सहमती दर्शविलेले अपक्ष आमदार मिळून आमचा आकडा १६९-७० च्या आसपास होता. बैठकीमध्ये चर्चा होत असताना काही गोष्टी घडल्या. याबाबत मलाही कल्पना नव्हती. आज सकाळी ६.४५ वाजता मला कळले की राजभवनावर राज्यपाल व इतर सजून तयार होते. नंतर लक्षात आले की, राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांच्यासह पक्षाचे आमदार व काही नेते शपथविधीसाठी उपस्थित आहेत. हा पक्षाच्या धोरणाच्या विरुद्ध निर्णय आहे. पक्षाचा नेता असो किंवा पक्षासाठी काम कार्यकर्ता असो तो भाजप सारख्या पक्षाच्या सरकार बनविण्याच्या निर्णयात सहभागी होणार नाही. काही सदस्य त्यांच्याबरोबर गेले त्यांचे पक्षांतर बंदी कायद्याच्या तरतुदी नुसार सदस्यपद अडचणीत येईल. महाराष्ट्रात भाजप बरोबर सरकार स्थापन करण्याच्या निर्णयाच्या विरोधात आम्ही आहोत. सर्वसामान्य माणूस त्यांच्या भूमिकेला पाठींबा देणार नाही. बहुमत सिद्ध करण्याची जी वेळ राज्यपालांनी दिली आहे. त्याची खबरदारी म्हणून राष्ट्रवादी-शिवसेना-कॉंग्रेसकडून काळजी घेतली जाईल. शपथविधीवेळी आठ ते दहा सदस्य कोण होते. त्यांची महिती घेतली. त्यावेळी जे जे सदस्य त्या ठिकाणी हजर होते त्यांनी नंतर मला भेटून तेथील परिस्थितीचा उलगडा केला.
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, आमच्यासह इतर दोन पक्षांनीही आपल्या आमदारांच्या सह्यांच्या याद्या पक्षाकडे सुपूर्द केल्या होत्या. राष्ट्रवादीची ही यादी विधिमंडळ पक्षनेता या नात्याने अजित पवार यांच्याकडे होती. ती यादी राज्यपालांना दाखवून अजित पवार यांनी भाजपला सत्तास्थापनेसाठी मदत केली. राष्ट्रवादीच्या ५४ आमदारांचा पाठींबा असल्याचे राज्यपालांना भासवून त्यांनी राज्यपालांची फसवणूक केली आहे. सदनात भाजपला बहुमत सिद्ध करता येणार नाही. या आधीही असा प्रकार घडला होता. १९८० मध्ये मला सोडून गेलेल्यांचा पराभव झाला आहे. आम्हीच सरकार बनवणार आहोत. कारण सरकार बनवण्यासाठीची तेवढी संख्या आमच्याकडे आहे. इडीच्या चौकशीमुळे अजित पवार गेले की काय माहित नाही. आम्ही शिवसेनेसोबत आहोत. आम्ही सर्वजन एकत्र आहोत, एकत्रच राहणार. अजित पवार यांच्याबाबतीत सर्व संमतीने पक्षाच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल. कॉंग्रेसच्या विधिमंडळ नेत्यांची बैठक असल्यामुळे ते परिषदेस उपस्थित नसल्याचेही पवार म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपने लोकशाहीच्या नावने खेळ-खंडोबा चालवला आहे. आमच्यावर जनादेशाचा अनादर केल्याचा आरोप केला जातो. शिवसेना उघडपणे करतो. आम्ही नाटक करीत नाही आम्ही तुमच्यासारखे रात्रीस खेळ चाले सारखे काम करीत नाही. भाजपने हरियाना, बिहार मध्ये जे केले त्याने जनादेशाचा आदर होतो? आम्हाला मित्र पक्ष, विरोधी पक्ष नको मी आणि मीच हवा, अशी हवा भाजपच्या डोक्यात आहे. पाठीवर वार झाल्यावर काय होतं हा इतिहास भाजपने लक्षात ठेवावा. रात्रीस खेळ चालून सत्ता मिळत नसते. पाकिस्तानवर जसा सर्जिकल स्ट्राईक केला त्याप्रमाणे महाराष्ट्रावर फर्जिकल स्ट्राईक करू नका, असा इशाराही ठाकरे यांनी यावेळी भाजपला दिला.
यावेळी बुलढाण्याचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे व बीडचे आमदार संदीप क्षीरसागर हे प्रतिक्रिया देताना म्हणाले की, आमच्यासह काही राष्ट्रवादीच्या आमदारांना कोणतीही माहिती न देता धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बोलवले. त्यानंतर आम्हाला राजभवनावर नेले. या दरम्यान आम्हाला कोणतीही कल्पना नव्हती.त्यावेळी अजित पवार तेथे आले. तेवढ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तेथे आले. काही वेळात राज्यपाल आले व मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपला शपथविधी उरकला. झाला प्रकार लक्षात आला असता, त्यांतर आम्ही सर्वजण पवार साहेबांना भेटलो. आम्ही पवार साहेबांना मानणारे आहोत. त्यांचे नेतृत्व आम्हाला मान्य असल्याच्या प्रतिक्रिया यावेळी या दोन आमदारांनी यावेळी दिल्या.












