न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चऱ्होली :- पिंपरी-चिंचवड शहरातील चर्होली, वडमुखवाडी, लक्ष्मी नारायणनगर कॉलनी या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून कमी दाबाने व अनियमित पाणीपुरवठा होत आहे. धरणात मुबलक पाणीसाठा असूनही महापालिका कृत्रिम पाणीटंचाई का करते? असा सवाल राष्ट्रवादीच्या नगरसेविका विनया तापकीर यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदनाच्या माध्यमातून विचारलेला आहे.
कृत्रिम पाणी टंचाईमुळे परिसरातील नागरिक वैतागलेले असून, येत्या सर्वसाधारण सभेच्या आधी या भागातील समस्या सोडवण्यात आल्या नाहीत, तर महापालिकेवर हंडा मोर्चा आणू, अशी ईशारावजा सूचना नगरसेविका विनया तापकीर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
यात पाणिपुरवठा विभागाच्या कर्मचार्यांमुळे ही समस्या निर्माण होत असून महापालिकेने पाणीपुरवठ्यासाठी या भागाकरीता स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यात यावी, बुस्टर पंपाची व्यवस्था करावी, पाण्याच्या वेळेचे योग्य नियोजन करावे, एक दिवसाआड पाणीपुरवठा केला तरी, तो पुरेशा दाबाने आणि पुरेश्या प्रमाणात पाणी मिळावयास हवे, अशा मागणीचे निवेदन नगरसेविका विनय तापकीर यांनी आयुक्तांना दिले आहे.
यावेळी तापकीर म्हणाल्या कि, समाविष्ट भागास नेहमीच दुजाभावाची वागणूक मिळाली आहे. समाविष्ट भागांचा महापालिकेत समावेश करताना नाही-नाही ती प्रलोभने दाखविली, परंतु आज साध्या पिण्याच्या पाण्याची सोयही महापालिका करू शकलेली नाही, त्यामुळे चऱ्होली, वडमुखवाडी व परिसरातील नागरिकांना अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.
महापालिकेच्या अनागोंदी कारभाराला येथील नागरिक वैतागलेले असून जनमताचा अतिरेक झाल्यास सत्ताधारी व प्रशासनास पळता भूई थोडी होईल. तेव्हा महापालिका प्रशासन व सत्ताधारी यांनी वेळीच हस्तक्षेप करून नागरिकांच्या मूलभूत समस्या सोडवाव्यात, अन्यथा परिसरातील नागरिकांची मोट बांधून तीव्र जनआंदोलन उभे केले जाईल, असे विनया तापकीर यांनी न्यूज पीसीएमसीशी बोलताना सांगितले.










