- रस्ता आराखडा व फेरफार कामातील अनियमितेतील दोषी अधिकाऱ्यांना शिक्षा – विजय पाटील
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २५ नोव्हेंबर २०१९) :- प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर केलेल्या कारवाई संदर्भात पिंपरी चिंचवड महापालिकेकडे माहीती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत माहिती मागवली होती. प्रशासन अधिकारी १ यांनी ती नाकारली होती. त्यावर पुन्हा त्यांनी दिनांक ६/०७/२०१९ रोजी अपील दाखल केले. त्यावर महापालिकेमध्ये ४ वेळा (१७/०७/२०१९,२८/०८/२०१९,२०/०९/२०१९,१०/१०/२०१९) सूनावण्या झाल्या. अपिलावर निर्णय होऊन अपिलकर्ते विजय पाटील यांचे बाजूने निर्णय देण्यात आला व त्यांचे अपील मान्य करण्यात आले. याबाबत त्यांनी प्रसिद्धीस पत्रक दिले आहे.
या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, सदरील निकालपत्राच्या विवेचनामध्ये सहायक आयुक्त, प्रशासन तथा प्रथम अपिलीय अधिकारी पिंपरी चिंचवड महापालिका यांनी स्पष्ट केले की, ताथवडे रस्ता आराखडा, फेरफार करणाऱ्या भूमापक नितीन जवळकर यांचे विरोधात दोषारोप सिद्ध झाले आहेत व तसे त्यांनी मान्यही केले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर शास्ती कार्यवाही झालेली आहे. तसेच सुभाष वि. खरात यांचे विरोधात फॊजदारी गुन्हा दाखल झालेला आहे व त्यांना न्यायालयीन कोठडी सुद्धा देण्यात आली. तदनंतर त्यांना सेवा निलंबितही करण्यात आले. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर पुढील कार्यवाही करणे बाकी आहे.
तदनंतर महाराष्ट्र शासनाचा एका निर्णयानुसार नि प्र आ – ११११/प्र. क्र.८६/११ – अ दिनांक १४/१०/२०११ यास अनुसरून खरात यांना पुनश्च कामावर घेतले. परंतु कार्यकारी पदावर न ठेवता अकार्यकारी पदावर त्यांची नेमणूक केली गेली. उपरोक्त विवेचनाच्या पार्श्वभूमीवर अपील मान्य करून पाटील यांचे अपील मान्य करण्यात आले.
या निर्णयासंदर्भात विजय पाटील म्हणाले,” २००० नंतर विकास आराखडायामधील महत्वाच्या रस्त्यांमध्ये व फेरफार मध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आल्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे खरात यांच्या काळात एचसीएमटीआर रस्त्यामधील जागेच्या टीडीआर मध्येही मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शासनाचा मोठा महसूल बुडाला आहे. या बाबत आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सखोल चौकशी करावी. कोकणे चौक ते कासारवाडी परिसरातील “एचसीएमटीआर”जागेतील टीडीआर, एफएसआय कामातही खरात ह्यांचा प्रत्यक्ष संबंध असल्याने त्याबाबत चौकशी करण्यात यावी. ह्यापुढे महापालिकेची प्रतिमा जनमानसात मलिन न होण्याची खबरदारी आता महापालिकेने घेणे आवश्यक आहे”, असे प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष विजय पाटील यांनी या पत्रकात त्यांनी म्हटले आहे.












