न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ डिसेंबर २०१९) :- भारतातील सर्वात मोठे ‘किसान’ कृषी प्रदर्शन ११ ते १५ डिसेंबर, २०१९ दरम्यान मोशी येथे संपन्न होणार आहे. या प्रदर्शनात भारतातील सहाशेपेक्षा अधिक कंपन्या, संशोधन संस्था व नवउद्योजक सहभागी होणार आहेत. प्रदर्शनात भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या कृषी मंत्रालयाने सहभाग घेतला आहे. तसेच पुणे आकाशवाणी माध्यम सहयोगी आहे. इंडियन पोस्ट बँकेने देखील यामध्ये सहभाग घेतला आहे. अशी माहिती ‘किसान’ कृषि प्रदर्शनचे संयोजक निरंजन देशपांडे यांनी दिली.
पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि संमेलन केंद्र, मोशी येथे हे प्रदर्शन होणार असून दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. प्रदर्शनात चीन, तैवान, इस्राईल, युनायटेड किंग्डम आदी देशातील कंपन्या सहभाग घेणार आहेत. पाच दिवसीय प्रदर्शनामध्ये देशभरातून सुमारे दोन लाखापेक्षा अधिक शेतकरी भेट देतील असा अंदाज संयोजक निरंजन देशपांडे यांनी व्यक्त केला.
देशपांडे म्हणाले, “आधुनिक तंत्रज्ञान व कृषि क्षेत्रातील नवे विचार शेतक-यांपर्यंत पोहोचविणे हे या प्रदर्शनाचे उद्दिष्ट आहे. यंदा किसान प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषि निविष्ठा, यंत्रसामुग्री, पशुधन, जैव ऊर्जा, नर्सरी, शेती लघुउद्योग अशी विभागवार आठ दालने उभी करण्यात आली आहेत. प्रत्येक दालनात त्या विशिष्ट विभागातील स्टॉल शेतक-यांना पाहायला मिळतील. शेतीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणांचे प्रदर्शन खुल्या जागेत केले आहे. पाण्याचे नियोजन व सिंचनासाठी लागणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणा-या १०० पेक्षा अधिक कंपन्यांचा सहभाग हे किसान प्रदर्शनातील मुख्य आकर्षण आहे. प्रदर्शन प्रवेशासाठी नावनोंदणी शुल्क १०० रुपये ठेवण्यात आला आहे. पूर्वनोंदणीची सुविधा greenpass.com या संकेतस्थळावर व kisan.net या मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे.
पूर्वनोंदणी केल्यास प्रवेश शुल्कात ५० रुपये सवलत देण्यात आली आहे. प्रदर्शन स्थळी जाण्यासाठी पुण्याच्या शिवाजीनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्र, लोकमंगल बस स्टॉप पासून बसची मोफत सोय करण्यात आली आहे. किसान प्रदर्शनाविषयी अधिक माहितीसाठी 020 30252020 किंवा www.kisan.in या संकेतस्थळावर संपर्क करावा, असे आवाहन देशपांडे यांनी केले आहे.


















