- आकाश बाजड या विद्यार्थ्याची किमया
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०४ डिसेंबर २०१९) :- प्रत्येकाला काही ना काही छंद असतो. हा छंदच माणसाची नवीन ओळख निर्माण करतो. भोसरी, दिघीरोड येथील पंधरा वर्षीय आकाशने ही एक असाच वेगळा छंद जोपासला आहे. त्याने त्याच्या छंदातून लाखो तांदळाच्या दाण्यांवर राम लिहित एक नवीन विक्रम केला आहे.
दिघीरोड येथे राहणाऱ्या आकाशने दुर्बिणीशिवाय तांदळावर विविध रंगामध्ये राम हे नाव लिहिले आहे. दोन महिन्यामध्ये दीड लाख दाण्यांवर त्यांने राम लिहित नवीन विक्रम केला आहे.
बाजड कुटुंबिय मूळचे बुलढाणा जिल्ह्यातील मुंदेफळचे आहेत. आकाशचे वडील हे सध्या नोकरीनिमित्त भोसरी येथे राहतात. त्यांनी तीन वर्षापूर्वी चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील ८० पानांचे २० धडे ए फोर पानाच्या एकाच बाजूला लिहिण्याची किमया साधली होती. पोस्टकार्डवर वंदे मातरम हे गीत २०२ वेळा आणि महात्मा गांधी जयंतीनिमित्त हे राम शब्द ४० हजार वेळा लिहिण्याचा विक्रम ही त्यांच्या नावावर आहे. वंदे मातरम हे गीत पोस्टकार्डवर लिहिल्याबद्दल त्यांची इनक्रेडेबल बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये देखील नोंद झाली होती. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवूनच आकाशने आपला हा अनोखा छंद जोपासला आहे.
आकाश ज्ञानसागर माध्यमिक विद्यालयात नववीमध्ये शिकत आहे. त्यांने केलेल्या या अनोख्या कार्याचे परिसरातील लोक कौतुक करत आहेत. वडिल गजानन बाजड म्हणाले, यापूर्वी मी छोट्या अक्षरामध्ये लिहिण्याचे अनेक प्रयोग यशस्वी केले आहेत. मी अशाप्रकारे लिहित असताना आकाश त्याचे बारकाईने निरीक्षण करायचा. त्यानंतर त्यानेही हळूहळू अशाप्रकारे लेखन सुरू केले. त्यातूनच पुढे त्याला तांदळाच्या दाण्यांवर राम लिहिण्याची कल्पना सुचली. त्याने ती यशस्वीपणे पूर्ण केली. त्याच्या या कामाची नोंद लिम्का बुक व आशिया बुक मध्ये करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे.
आकाश बाजड म्हणाला की, रोज सकाळी ७ ते दुपारी १२ पर्यंत मी शाळेत जातो. त्यानंतर शिकवणी वर्ग आणि गृहपाठ पूर्ण करून मी हे काम केले. १२ रंगामध्ये राम हे नाव तांदळाच्या दाण्यावर लिहिले आहे. यासाठी वडिलांनी मला खूप प्रोत्साहन दिले.















