न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ८ डिसेंबर २०१९) :- दिघीसह उपनगरातील विस्कळीत पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ नगरसेवक विकास डोळस यांनी पाणीपुरवठा विभागाचे सह-शहर अभियंता मकरंद निकम यांना शनिवारी (दि. ७) रोजी गुलाबपुष्प भेट देऊन गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले. तसेच, पाणीपुरवठा विभागाने आजारातून बरे व्हावे, असे आवाहन केले. तसेच, येत्या दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास मोर्चा काढण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
यावेळी नगरसेवक लक्ष्मण उंडे, कुलदिप परांडे, राजेंद्र तापकीर, सागर डोळस, सिकंदर मुजावर, दिपक परांडे, प्रमोद परांडे, अनिकेत कुऱ्हाडे, संतोष निकाळजे, विनोद डोळस आदी उपस्थित होते.
नगरसेवक डोळस म्हणाले, एक दिवसाआड पाणीपुरवठा केल्यापासून पाण्याची समस्या तीव्र झाली आहे. दिघी आणि उपनगरांमध्ये या समस्येची तीव्रता आधिक जाणवत आहे. पाणीपुरवठा विस्कळीत होण्यासाठी पंप नादुरूस्त असल्याची कारणे दिली जात आहेत. याबाबत सातत्याने तक्रार करूनही समस्या सुटत नाही. त्यामुळे गुलाबाचे फूल देऊन निषेध केला. आता “गेट वेल सून’ म्हणत आहोत. मात्र, पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.















