न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ११ डिसेंबर २०१९) :- ग्रामपंचायतीच्या वतीने तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या पुढाकाराने खास महिलांसाठी मोफत चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण शिबीर राबविण्यात येत असल्याने त्याद्वारे गावातील शेकडो महिला स्वावलंबी व अधिक सक्षम होणार आहेत.
बदलत्या काळानुसार महिलांनी दुचाकीपासून ते विमान व अंतराळात देखील आपले यशस्वी पाऊल ठेवले आहे. आजच्या घडीला महिला कुठल्याही क्षेत्रात मागे राहिल्या नाहीत. आपल्या सुप्त गुणांना वाव देत कार्याचा व कर्तृत्वाचा ठसा तिने समाजात उमटवावा म्हणून शहरी भागाबरोबरच ग्रामिण भागातही ग्रामपंचायती मार्फत विविध व्यवसायाभिमुक कोर्सेसचे प्रशिक्षण दिले जाते.
त्याच अनुषंगाणे चारचाकी चालविणे शिकल्यास महिला अधिक सक्षम होऊन आपल्या संसाराला हातभार लावू शकतील या हेतूने जांबेत नुकतेच चारचाकी प्रशिक्षण शिबिराचा प्रारंभ करण्यात आला. या कोर्सचा तब्बल १५० महिला दोन तुकडीमध्ये लाभ घेत आहेत.
याप्रसंगी सरपंच गणेश गायकवाड, उपसरपंच प्रकाश निकाळजे, ग्रामसेविका माधुरी खैरे, माजी सरपंच अंकुश गायकवाड, माजी उपसरपंच शिला मगर, रंजना गायकवाड, रुपाली गायकवाड, सुजाता गायकवाड, योगिता मांदळे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.












