- कामगार नेते इरफान सय्यद यांची अर्थ व कामगार मंत्री जयंत पाटलांकडे भेटीदरम्यान मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ डिसेंबर २०१९) :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासु साथीदार तसेच राज्यात महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेत महत्वाची भूमिका बजावलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळात अर्थ व कामगारमंत्री म्हणून पदभार स्वीकारलेले जयंत पाटील यांची कामगार नेते तथा शिवसेना भोसरी-खेड विधानसभा सहसंपर्क प्रमुख इरफान सय्यद यांनी मुंबईत नुकतीच भेट घेतली. तसेच त्यांची अर्थ व कामगारमंत्री पदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन करीत शुभेच्छ्या दिल्या.
याप्रसंगी कामगार नेते इरफान सय्यद यांनी अर्थ व कामगारमंत्री जयंत पाटील यांच्याशी असंघटीत क्षेत्रात काम करीत असणाऱ्या माथाडी, बांधकाम कामगार, जनरल कामगार यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर चर्चा केली. कामगारांच्या प्रश्नावर आपल्या सरकारनं योग्य निर्णय घेऊन तसेच शासनाच्या कामगारांच्यासाठीच्या बंद पडलेल्या योजना पुर्ववत सुरू करून, असंघटीत बांधकाम, माथाडी, मापाडी कामगारांना महाविकास आघाडी सरकारने न्याय देत त्यांच्या चेह-यावर हास्य फुलवण्याचे काम करावं, अशी विनंतीवजा मागणी सय्यद यांनी जयंत पाटील यांच्याकडे भेटी दरम्यान केली.
यावेळी कामगारमंत्री जयंत पाटील यांनी इरफान सय्यद यांच्या मागण्यांबाबत उपायोजना करून, कामगारांप्रती जिव्हाळा जपत त्यांना शासकीय योजनांमध्ये सामावून घेण्याबाबत सकारात्मक पाउलं उचलण्याचे आश्वासन दिले.