न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ डिसेंबर २०१९) :- वक्तशीरपणा ज्याला समजला त्यालाच शरद पवार समजले असे प्रतिपादन संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी केले. राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने नाट्य, कला, क्रीडा, साहित्य सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मधु जोशी, विघ्नहरी देव महाराज, मिलिंद गुंजाळ, माधव सहस्त्रबुद्धे, मारुती आडकर, जयश्री लेले, संजीवनी मुळे-नगरकर, जंगलराव भोईर, गीत शर्मा, शारदा मुंडे, विद्याधर सिधये यांचा रामचंद्र देखणे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देवून गौरविण्यात आले.
त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावरती अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शिरुर येथील अध्यक्षा दिपाली शेळके, पालिकेतील विरोधी पक्षनेते नाना काटे, पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँगे्रस पार्टीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, सौ. किरण भोईर, मानसी भोईर, मुख्यनिमंत्रक व अध्यक्ष भाऊसाहेब भोईर उपस्थित होते.
संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे पुढे म्हणाले, शरद पवार यांनी गाव, राज्य, देशासाठी राजकारणाच्या पलिकडे जावून लोकहिताची कामे आजही करत आहेत. आज या रंगमंचावर आपल्या जीवनाच्या रंगभूमीवर वेगवेगळी कला दाखविणारे विविध क्षेत्रातील सत्कारमूर्ती मान्यवरांचा सत्कार केला ही अभिनंदनीय बाब आहे. जणू चतुरंग रंगभूमी याच रंगमंचावर आज आहे. विविध कलावंतांच्या सानिध्यात राहून भाऊसाहेब भोईर त्यांचा आदर्श घेत आपली वाटचाल करीत आहे ही कौतुकास्पद बाब आहे.
सत्काराला उत्तर देताना माजी रणजीपटू मिलिंद गुंजाळ म्हणाले, शरद पवार भारतीय क्रिकेट व्यवस्थापनाचे अध्यक्ष असताना खेळाडूंना पेन्शनची योजना चालू केली. त्यामुळेच आज अनेक खेळाडू उत्तम आयुष्य जगत आहे. कबड्डी, खो-खो, क्रिकेट आदी क्रीडा क्षेत्रातील ज्या-ज्या गुणवंत खेळाडूंना त्यांचा परिघस्पर्श झाला त्या-त्या खेळाडूंचे त्यांच्यामुळे आज सोने झाले आहे ही माझ्या दृष्टीने फार मोठी गोष्ट आहे.
अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले. सूत्रसंचालन व आभार श्रीकांत चौगुले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष पाटील, सुहास जोशी, रघु ढेमरे, अजय ढवळे, राजू बंग, संतोष शिंदे आदींनी परिश्रम घेतले.