- माहिती अधिकारात प्राप्त नकाशांवरून सिद्ध – विजय पाटील…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ डिसेंबर २०१९) :- सध्या शहरात बेकायदेशीर एचसीएमटीआर रस्ता बनविण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर विशेष परिश्रम घेत आहेत. शहर अभियंता राजन पाटील यांनी डी पी नकाशाची पडताळणी न करताच याबाबत बेकायदेशीर निर्णय घेतल्याचे वा हितसंबंध जपण्यासाठी कासारवाडीच्या सुरू असलेल्या स्त्याच्या कामामुळे निदर्शनास आले आहे. शहर अभियंता ह्या जबाबदार पदावर काम करत असताना जनतेच्या पैशाची अशी सरळ सरळ लूट करणेच नव्हे काय? असा प्रश्न पिंपरी चिंचवडच्या रिंग रोड बधितांना पडला आहे. कासारवाडी येथे सुरू असलेले एचसीएमटीआर चे काम पूर्णतः बेकायदेशीर आहे. माहिती अधिकारात प्राप्त झालेले “एचसीएमटीआर” चे नकाशे तपासल्यावर सदरची धक्कादायक बाब उघड झाली असल्याचा गौप्यस्फोट घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील यांनी केला आहे. याबबत त्यांनी प्रसिद्धीस पत्रक दिले आहे.
या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, सध्या कासारवाडी येथे रात्रंदिवस युद्धपातळीवर एचसीएमटीआर चे काम सुरू आहे. सदरचे बेकायदेशीर काम पिंपरी चिंचवड शहराचे आयुक्त श्रावण हर्डीकर व शहर अभियंता राजन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली मे. व्ही. एम. मातेरे कंपनीकडून करून घेण्यात येत आहे. एचसीएमटीआर संदर्भात दिनांक ५/०३/२०१८ रोजी नियमबाह्य पद्धतीने रस्ता बनविण्याची २८,४५५१३४०/- रुपयांची निविदा मे. मातेरे कंपनीच्या नावाने काढण्यात आलेली आहे. सदरच्या प्रकल्पास महाराष्ट्र शासनाची मंजुरी नाही. सदर प्रकरणी जनहित याचिका क्रमांक १२८/२०१८ मुंबई उच्च न्यायालयात दाखल आहे. तरीही सदरचे बेकायदेशीर काम सुरूच आहे.
सदरची निविदा ही डी पी ओपनिंग च्या आरेखन प्रमाणे नसून त्याबाबत ची कागदपत्रे व डी पी ओपनिंग चे नकाशे पडताळनी केल्याने ही धक्कादायक बाब उघडकीस आली. कासारवाडी येथे सुरू असलेले रस्त्याचे काम डी पी ओपनिंग चे नकाशे क्रमांक २४,२५,३१ नुसार पुणे महानगरपालिकेच्या ३६ की मी च्या एचसीएमटीआर आरेखन मध्ये समाविष्ट असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे सदर ठिकाणी एचसीएमटीआर मार्ग करण्याचा प्रथम अधिकार हा पुणे महानगरपालिकेचा असून त्याबाबत काढलेल्या निवेदेस महाराष्ट्र शासनाने तत्वतः मान्यताही दिलेली आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिका कासारवाडी येथे करीत असलेले एचसीएमटीआर चे काम हे बेकायदेशीरपणे करीत असल्याचे उघड झाले आहे, असेही पाटील म्हणाले.
डी पी ओपनिंग च्या पान नंबर २३३,२३४ व २४० नुसार पिंपरी महापालिकेचा आरेखीत एचसीएमटीआर प्रकल्प हा पूर्वेकडील भोसरी हद्दीत सीएमई जवळ पुणे नाशिक महामार्गालगत पुणे महापालिकेच्या आरेखीत एचसीएमटीआर ला जोडलेला दिसून येत आहे व पश्चिमेकडील पिंपरी पालिकेचा एचसीएमटीआर हा फुगेवाडी येथे पुणे महापालिकेच्या आरेखीत एचसीएमटीआर ला जोडलेला दिसून येत आहे. काही लाभापोटी पालिका अधिकारी डी पी सुद्धा विसरून गेलेले आहेत व मनमानी पद्धतीने नकाशे न तपासताच नियमबाह्य पद्धतीने रस्त्याचे काम करीत आहेत. महानगरपालिकेच्या अधीकाऱ्यांकडून सद्यस्थितीत होऊ घातलेले रस्त्याचे काम हे जनहितार्थ नसून फक्त काही मुठभर लोकांचे आर्थिक हित जपण्यासाठी व जमीन हस्तांतरित घोटाळा लपविण्यासाठी साकारत असल्याचे दिसून येत आहे, असेही पाटील म्हणाले.
या बाबत घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील म्हणाले,” सध्या शहरात बेकायदेशीर एचसीएमटीआर रस्ता बनविण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर विशेष परिश्रम घेत आहेत. शहर अभियंता राजन पाटील यांनी डी पी नकाशाची पडताळणी न करताच याबाबत बेकायदेशीर निर्णय घेतल्याचे वा हितसंबंध जपण्यासाठी कासारवाडीच्या सुरू असलेल्या स्त्याच्या कामामुळे निदर्शनास आले आहे. शहर अभियंता ह्या जबाबदार पदावर काम करत असताना जनतेच्या पैशाची अशी सरळ सरळ लूट करणेच नव्हे काय? असाच प्रश्न पिंपरी चिंचवड च्या रिंग रोड बधितांना पडला आहे. या रस्त्यासंदर्भात कासारवाडीतील रिंग रोड बाधित स्थानिक राहिवास्यांनी नुकतीच त्या प्रभागातील नगरसेवकांची भेट घेतली असता त्यांनाही या बाबत पालिका प्रशासनाने कोणतीही पूर्वकल्पना दिल्याचे आढळून आले नाही. नगरसेवकांनाही याबाबत पूर्णतः अंधारात ठेवण्यात आले, असे पाटील यांनी या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.