न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ डिसेंबर २०१९) :- पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत एटीएम चोरीच्या गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देहूरोड, चिखली आणि चाकण परिसरात सर्वाधिक घटना घडत आहेत. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात ‘विशेष तपास पथका’ची (एसआयटी) स्थापना करण्यात आली आहे.
चाकण येथे एटीएम मशिन खेचून नेण्याच्या घटनेची पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी गांभीर्याने दखल घेतली. रविवार असूनही गुन्हे शाखेच्या सर्व अधिकाऱ्यांची बैठक चाकण येथे घेण्यात आली. यापूर्वी केलेल्या तपासणीमध्ये आरोपी ग्रामीण भागाच्या दिशेने पळून जाताना दिसून आले आहेत. यामुळे रविवारी आयुक्त संदीप बिष्णाई यांनी बोलविलेल्या बैठकीस ग्रामीण पोलिसांचे स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी तसेच खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकही उपस्थित होते.
शहरात आजवर घडलेल्या एटीएम चोरीच्या घटनांचा तपास करण्यासाठी गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. शहराच्या विविध भागातील तपासात निपुण असलेल्या अधिकाऱ्यांना त्यांच्या जोडीला देण्यात आले आहे.












