न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ डिसेंबर २०१९) :- बो- हाडेवाडी येथील ७८ हेक्टर शेतजमिनीवर नगररचना योजना राबविण्यात येत आहे. येथे नगररचना योजना, टीपी स्कीम राबवताना ग्रीन झोन क्षेत्रच आर झोन होणार असल्याने टीपी स्कीमबाबत शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद असून लवकरच डेमो लेआउट तयार करून नागरिकांसमोर त्याचे सादरीकरण करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांकडूनदेखील सूचना मागविणार असून त्यानुसार योजनेच लेआउट तयार करू, अशी माहिती नगररचना विभागाचे उपसंचालक रा. म. पवार यांनी दिली. बो- हाडेवाडीतील शेतकऱ्यांची नुकतीच बैठक आयोजिण्यात आली होती. त्यात पुढील बैठकीचे नियोजन करण्यात आले. माजी उपमहापौर शरद बोहाडे, माजी नगरसेवक अरुण बो-हाडे, उद्योजक नितीन बो-हाडे, गुलाब बनकर, गणपत ओझरकर, सतीष बनकर व इतर शेतकरी उपस्थित होते.
या बैठकीत टीपीबाबत माहिती देताना काही महत्त्वाचे मुद्दे मांडण्यात आले. टीपी राबविल्यास येथील जागेचा दर तीनपट वाढणार म्हणजेच चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपये प्रतिगुंठा दर होणार, ज्यांची ज्या ठिकाणी शेती आहे. त्याच ठिकाणी त्यांना प्लॉट्स उपलब्ध होणार आहेत. ज्यांचे बांधकाम या जागेत येत आहे. त्याला कोणताही धोका नाही. बांधकाम प्लॉटसमध्ये तसेच ठेवले जाईल. विहिरींना कोणतेही नुकसान नाही. वर्षभरात योजना मार्गी लागेल, एफएसआय व टीडीआर वापरता येईल, असे प्लॉटस लाभ क्षेत्रानुसारच वाटप होणार, प्रत्येक प्लॉटला रोड मिळणार, टीपी राबविल्यानंतर मिळालेला प्लॉट डेव्हलप करण्याबाबत कसलेही बंधन जागेत नाही. कितीही वर्ष प्लॉट तसाच ठेवता येईल, त्यावर काय करायचे शेतकऱ्यांच्या मनावर असेल. तेही योजना राबवताना शेतकऱ्यांना एक रुपया देखील खर्च करावा लागणार नाही, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
यावर शेतकऱ्यांनीदेखील इतर टीपी प्रश्न उपस्थित केले. त्यांचे निरसन करण्यासाठी डेमो प्लॅन लेआउट तयार करून तो पुढील बैठकीत सादर करण्याचे ठरले असल्याचे प्रशासनाने सांगितले.












