न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ डिसेंबर २०१९) :- नेहरुनगर येथील कै. अण्णासाहेब मगर स्टेडियमची इमारत जीर्ण झाल्याने ती पाडण्यात येणार आहे. त्या ठिकाणी मैदान व इमारतीचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. यासाठी २०० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असून अत्याधुनिक सोयी – सुविधायुक्त मैदानाचा विकास केला जाणार आहे. नव्या स्टेडियममध्ये विविध खेळांसाठी सुविधा उपलब्ध करुन देता येणार आहे. विशेषतः मैदानी खेळांसाठी चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
नव्या मगर स्टेडियममध्ये क्रिकेटचे मैदान, क्लायम्बिग वॉल, अॅथलेटिक्सचा सिंथेटिक ट्रॅक, होस्टेल, टेनिस कोर्ट, बास्केट बॉल आदी सुविधा पुरविण्यात येणार आहे. या कै. अण्णासाहेब मगर स्टेडियमचा अद्यावत क्रीडासंकुलाच्या प्रकल्पाचे महापालिकेचे पदाधिकारी, गटनेते व अधिकाऱ्यांसमोर सल्लागारांने सादरीकरण केले.
या वेळी महापौर माई ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर व अधिकारी उपस्थित होते. जुने स्टेडियम पाडण्यास स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली. त्याठिकाणी २५ एकर जागेत अद्यावत क्रीडासंकुल तयार करण्यात येणार आहे. नव्या क्रीडा संकुलामध्ये प्रत्येक खेळाची स्वतंत्रे मैदाने असणार आहेत.















