न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० डिसेंबर २०१९) :- केवळ हजार रुपयात बोगस रेशनिंग कार्ड तयार करून देणाऱ्या एजंट महिलेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना निगडीतील परिमंडळ अधिकारी ‘अ ‘ विभाग येथे उघडकीस आली. याप्रकरणी आशा झुंबड गाडेकर (५०, रा. वाकड) यांनी गुरुवारी (दि. १९) निगडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिवे ताई (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गाडेकर या जुलै २०१९ मध्ये रेशनिंग कार्ड काढण्यासाठी निगडी येथील कार्यालयात गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी दिवे हिने रेशनिंग कार्ड काढून देण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून एक हजार रुपये घेतले. त्यानंतर गाडेकर यांना आपल्या रेशनिंग कार्डमध्ये आणखी एक नाव वाढवायचे होते. त्यासाठी त्या घटनेची काही दिवसांपासून निगडीतील परिमंडळ अधिकारी ‘ अ ‘ विभाग येथे चकरा मारत होत्या.
काम होत नसल्याने गुरुवारी त्या थेट रेशनिंगमध्ये अधिकाऱ्यांना भेटल्या. यावेळी रेशनिंग कार्डवरील सह्या व शिके पाहून त्यांचे रेशनकार्ड बोगस असल्याचे संबंधित कार्ड अधिकाऱ्याच्या निदर्शनास आले. रेशनिंग अधिकाऱ्यांनी गाडेकर यांना सोबत घेऊन थेट निगडी पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी देखील घटनेची गांभीर्याने दखल घेत एजंट महिलेवर गुन्हा दाखल केला. पुढील तपास तपास निगडी पोलिस करीत आहेत.


















