न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० डिसेंबर २०१९) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या सारथी हेल्पलाईन या वेब पोर्टलवरील तक्रारीवर मुदतीमध्ये उपाययोजना न केल्याने पालिकेच्या दहा वरिष्ठ अधिकाऱ्यांना २५० ते ५०० रुपये दंड करण्यात आला आहे. यापुढे तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिला आहे.
कारवाई झालेल्या अधिकाऱ्यांमध्ये अभियंता राजन पाटील, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, पाणीपुरवठा विभागाचे उपशहर अभियंता रामदास तांबे, आरोग्य अधिकारी डॉ. के. अनिल रॉय, करसंकलन विभागाच्या सहायक आयुक्त स्मिता झगडे, नगररचना विभागाचे उपसंचालक राजेंद्र पवार, आरोग्य कार्यकारी अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरूण दगडे, कार्यकारी अभियंता देवन्ना गट्ठवार, कार्यकारी अभियंता विजयकुमार काळे यांचा समावेश आहे.
पशुवैद्यकीय विभागाच्या तब्बल ४०६ तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने डॉ. दगडे यांना ५०० रूपये दंड करण्यात आला आहे. पाणीपुरवठ्या संदर्भातील तक्रारींकडे कानाडोळा केल्याने तांबे आणि अतिक्रमण विषयक तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने पाटील यांना प्रत्येकी ५०० रूपये दंड करण्यात आला आहे. उर्वरित अधिकाऱ्यांना आप-आपल्या विभागातील २ ते ३ तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने प्रत्येकी २५० रुपये दंड करण्यात आला आहे. हा दंड डिसेंबर महिन्याच्या वेतनातून कापला जाणार आहे.
सारथी हेल्पलाईन, पालिका संकेतस्थळ, व्हॅट्सअॅप, फोन, तोंडी तसेच, जिल्हाधिकारी, राज्य व केंद्र शासनाच्या संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या तक्रारींचे मुदतीमध्ये निरसन करण्याचे आदेश वेळोवेळी दिले. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केल्याने कार्यालयीन शिस्तीचा भंग झाला. त्यामुळे दंड करण्यात आल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.


















