न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २० डिसेंबर २०१९) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेने चौकांतील, रस्त्याच्या दुतर्फा तसेच पदपथांवरची अतिक्रमणे हटविण्याची जोरदार मोहीम हाती घेतली आहे. विधानसभा निवडणुकीनंतर अतिक्रमणे आणि अनधिकृत बांधकामांविरोधात मोहीम तीव्र करण्यात आली आहे. त्या संदर्भात शहर पोलिस निरीक्षकांबरोबर महत्त्वाची बैठक गुरुवारी (दि. १९) मोरवाडी येथील ऑटो क्लस्टर सभागृहात आयोजित केली होती.
यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्यासह सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. दरम्यान महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या चार पथकांनी दि. १९ डिसेंबरअखेर २६० हातगाड्या, १२ टेंपो, ६० टपऱ्या आणि २ हजार ६०० पथारीवाल्यांचे साहित्य जप्त केले. पूररेषा, रेडझोन तसेच आरक्षणावर अवैध बांधकामे आणि रस्ता, पदपथांवरची अतिक्रमणे मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्याविरोधात तीव्र कठोर कारवाईचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
त्यासाठी गुरुवारी पालिकेचे प्रमुख अधिकारी आणि पोलिस यांची समन्वय बैठक आयोजित केली होती. बैठकीत विस्तृत चर्चा झाली. पिंपरी, चिंचवड, निगडी, एमआयडीसी, भोसरी, वाकड, दिघी, सांगवी, हिंजवडीचे पोलिस निरीक्षक तसेच वाहतूक शाखेचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.


















