- गोडांबे यांची महापालिका आयुक्तांकडे मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ डिसेंबर २०१९) :- देशातील एकमेव डाव्या कम्युनिष्ट विचारांचे राज्य असलेल्या केरळमध्ये बहुतेक शाळांत वॊटर बेल (पाणी बेल) चा वापर गेल्या दोन वर्षांपासून सुरु झाला आहे. दररोज ठराविक प्रमाणात (६-८ ग्लास) पाणी पिणे सर्वांना आवश्यक असते व न पिल्यास त्याचे शरीरावर प्रतिकूल परिणाम होत असतात. त्यामुळे केरळमधील शाळांमध्ये सुरु असलेला हा उपक्रम निश्चितच अभिनंदनीय व अनुकरणात्मक आहे. एका मुलाला पाणी न पिल्याने चक्कर आल्यावर त्यातून जागे होऊन केरळमध्ये याची सुरुवात झाली होती.
याची दखल घेत मागील नोव्हेंबर महिन्यात कर्नाटक, तेलंगणा व ओरिसा या राज्यांतील सरकारांनी आपणही आपल्या राज्यात याची अंमलबजावणी करणार असल्याचे जाहीर केले आहे. अनेक शाळांत मुलींसाठी पुरेशी व स्वच्छ स्वच्छतागृहे नसल्याने मुली कमी पाणी पितात व आरोग्यावर परिणाम करून घेतात त्यामुळे या उपक्रमामुळे त्या प्रश्नावरही काम केले जाईल. कमी पाणी पिल्याने मुतखडा, पोटाचे व त्वचेचे आजार, किडनीचे आजार इ. होतात जे या वॊटर बेलच्या अंमलबजावणीमुळे दूर होतील.
परवाच पुणे महापालिकेनेही याची दखल घेत याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे पिंपरी पालिका आयुक्तांना विनंती आहे की त्यांनीही या अत्यंत चांगल्या उपक्रमाची दखल घेत पिंपरी चिंचवड मधील सर्व सरकारी व खासगी शाळांसाठी वॊटर बेल सक्तीने लागू करण्याचे आदेश तातडीने द्यावेत अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन गोडांबे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेद्नाद्वारे केली आहे.















