न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड शहरातील किरकोळ खाजगी व्यवसाय करणा-या तसेच पान विक्रेते, भाजीपाला विक्री व्यवसाय करणारे, हातगाडी चालक, टपरीमध्ये व्यवसाय करणारे विक्रेते यांना याद्वारे सूचित करण्यात येते की, घनकचरा व्यवस्थापन अधिनियम, २०१६ नुसार शहरामध्ये कच-याची विल्हेवाट लावण्याकरिता पध्दत विहित करण्यात आलेली आहे. तसेच उत्पन्न होणा-या कच-याची योग्य पध्दतीने विल्हेवाट न लावणा-या आस्थापनांविरुध्द दंडात्मक कार्यवाहीची तरतूद करण्यात आलेली आहे. परंतु, अनेकदा खाजगी व्यवसाय करणा-या आस्थापनांमार्फत इतरत्र कचरा टाकण्यात येत असल्याचे आढळून आलेले आहे. त्यामुळे शहरामध्ये अस्वच्छता पसरविण्यास किरकोळ व्यावसायिक कारणीभूत ठरत आहेत.
यास्तव शहरातील सर्व किरकोळ खाजगी व्यवसाय करणा-या तसेच पान विक्रेते, भाजीपाला विक्री व्यवसाय करणारे, हातगाडी चालक, टपरीमध्ये व्यवसाय करणारे विक्रेते इ. यांना कळविण्यात येते की त्यांचेमार्फत व्यवसाय करित असलेल्या ठिकाणी त्यांचेमार्फत कचरापेटी ठेवण्याची कार्यवाही करावी. तसेच त्याठिकाणी उत्पन्न होणारा कचरा कचरापेटीमध्येच टाकण्याचीही खबरदारी घ्यावी. भाजीपाला विक्रेत्यांनी त्यांचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर व्यवसाय करित असलेल्या परिसरामध्ये भाजीपाल्याची सालपटे अथवा इतर कचरा उचलून घेवून त्याठिकाणी अस्वच्छता होणार नाही याची नियमित खातरजमा करावी. तसेच महानगरपालिकेमार्फत कचरा संकलनाकरिता नियुक्त करण्यात आलेल्या वाहनांकडे कचरा जमा करण्याचीही दक्षता घ्यावी.
यापुढे कोणत्याही किरकोळ खाजगी व्यवसाय करणा-या तमेच पान विक्रेते, भाजीपाला विक्री व्यवसाय करणारे, हातगाडी चालक, टपरीमध्ये व्यवसाय करणारे विक्रेते इ. विक्रेत्यांमार्फत त्यांचे परिसरात अस्वच्छता असल्याचे आढळून आल्यास अथवा त्यांचेमार्फत कचरापेटी ठेवण्यात आली नसल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित आस्थापना / विक्रेता यांचेविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के अनिल रॉय यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.












