न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ डिसेंबर २०१९) :- पुण्यातील लोहगाव भागात एका २८ वर्षीय परदेशी महिलेवर दोन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून दोन आरोपींचा विमानतळ पोलिसांकडून कसून शोध सुरू आहे.
पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेला काल (दि. २३) रात्री उशीरा कोरेगाव पार्क येथून कोंढवा येथे जायचे होते. पीडित महिला साड्यांच्या निर्यातीचा व्यवसाय करते. कोंढव्याला जाण्यासाठी तिने एका दुचाकी चालकाकडे लिफ्ट मागितली. त्या दुचाकी चालकाने लगेचच मित्राला फोन करून लोहगाव येथील मैदानावर बोलावले. लिफ्ट मागणाऱ्या महिलेला तो दुचाकी चालक मैदानावर घेऊन गेला. तेथे दोघांनी त्या महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली. अत्याचारानंतर पीडित महिलेने, मला आता किमान रस्त्यावर तरी सोडा अशी विनवणी केली. त्यावर आरोपी त्या पीडित महिलेला दुचाकीवरुन घेवून पुन्हा रस्त्याने जाण्यास निघाले. पण काही अंतरावर गेल्यानंतर लगेचच एका चौकात दुचाकी घसरून पडली, त्यावेळी पीडित महिलेला दोघे आरोपी रस्त्यावर सोडून निघून गेले.
त्यानंतर, चौकात उभ्या असलेल्या नागरिकांनी पीडित महिलेला पोलीस स्टेशनमध्ये आणून सोडले. नंतर या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दोघा आरोपींचा शोध सुरू असल्याचे विमानतळ पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.















