न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ डिसेंबर २०१९) :- पुणे महामेट्रोने पिंपरी ते दापोडी या मेट्रो मार्गावर डिसेंबरअखेर प्रवासी वाहतूक सुरू करण्याचा दावा केला होता. मेट्रो महिनाअखेपर्यंत सुरू होणार नसली तरी मेट्रो रेल्वेचे इंजिन आणि डबे पिंपरी-चिंचवड शहरवासीयांना लवकरच पाहायला मिळणार आहेत.
मेट्रोचे इंजिन आणि डबे रविवारी (२९ डिसेंबर) पिंपरीतील उन्नत मार्गावर चढविले जातील. तसेच सुरुवातीला काही अंतरात मेट्रोची प्रत्यक्ष चाचणी घेण्यात येणार आहे.
महामेट्रोच्या वतीने पिंपरी ते दापोडी दरम्यानच्या साडेपाच किलोमीटर अंतरापैकी साडेतीन किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित दोन किलोमीटरचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. विद्युतीकरणासाठी खांब उभारण्याचे काम सुरू आहे. तसेच तीन मेट्रो स्थानकांचे काम वेगात सुरू आहे, अशी माहिती महामेट्रोचे मुख्य जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे यांनी दिली.












