- हातातल्या हंटरने हातावरील पोट असणाऱ्या किरकोळ व्यावसायिकांना दाखवली जातेय भीती…
- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर कस्पटे यांचा आरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ डिसेंबर २०१९) :- पिंपरी चिंचवड महापालिका शहरातील सर्व किरकोळ-खासगी व्यवसाय करणारे तसेच, पान विक्रेते, भाजीपाला विक्री व्यवसाय करणारे, हातगाडी चालक, टपरीमध्ये व्यवसाय करणारे विक्रेते आदींना ‘घनकचरा व्यवस्थापन अधिनियम २०१६’ च्या अनुषंगाने दंडात्मक कारवाईचा बडगा दाखवत आहे. मात्र, दंडात्मक कारवाईचा इशारा देत असताना मुळात ही परीस्थित महापालिका प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारामुळेच उद्भवली आहे, याकडे कानाडोळा करीत, केवळ हातातल्या हंटरद्वारे या हातावरील पोट असणाऱ्या किरकोळ व्यावसायिकांना भीती दाखवत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ज्ञानेश्वर कस्पटे यांनी केला आहे. याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त हर्डीकर यांना निवेदन दिले आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात कस्पटे यांनी म्हटले आहे की, कोणताही किरकोळ खासगी व्यवसाय करणा-या तसेच पान विक्रेते, भाजीपाला विक्री व्यवसाय करणारे, हातगाडी चालक, टपरीमध्ये व्यवसाय करणारे विक्रेते इ. विक्रेत्यांमार्फत त्यांचे परिसरात अस्वच्छता असल्याचे आढळून आल्यास अथवा त्यांचेमार्फत कचरापेटी ठेवण्यात आली नसल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित आस्थापना / विक्रेता यांचेविरुध्द दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा फतवा पिंपरी चिंचवड महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी काढला आहे.
या निर्णयाचे प्रथमतः मी स्वागतच करतो. परंतु, आपण आजपर्यंत सदर व्यवसाय करणाऱ्या गोर-गरीब जनतेसाठी महापालिकेच्या एकूण ३२ प्रभागामध्ये किती हॉकर्स झोनची निर्मिती केली? सध्या शहरात शेतकरी आठवडे बाजार भरण्याचे फ्याड आले आहे. त्यात कितीतरी अनधिकृत आठवडे बाजार नगरसेवकांच्या मनमानी कारभारामुळे भरतात. त्यावर आजपर्यंत आपण किती कारवाया केल्या? शहरातील अनधिकृत चिकन सेंटर्सबाबत महापालिकेची भूमिका काय आहे? चिकन सेंटरच्या दुर्गंधीमुळे शहरात रोगराई वाढत आहे. अशा किती चिकन सेंटरवर आपण कारवाई केली? याचे प्रथम उत्तरं द्या. आयुक्तसाहेब केवळ निजामशाहीने प्रश्न सुटत नसतात.
कचऱ्या संदर्भात आपण कुठल्या प्रकारचे प्रयोजन केले. जर केले नसेल तर, संबंधित विभागाकडे परवानगी देताना कचऱ्याचे विघटन करणेसाठी कोणते पर्याय दिले. प्रशासनाच्या निष्क्रीयतेमुळे आज शहर बकाल होत आहे. केवळ कागदी घोडे न नाचवता, संबंधित गोरगरीब जनतेच्या हिताचा विचार करून त्यांच्यावर कारवाईचा बडगा न उगारता सर्वप्रथम शहरातील प्रत्येक प्रभागात हॉकर्स झोनची उभारणी करावी. त्यामुळे या खासगी-किरकोळ व्यावसायिकांना घनकचरा विल्हेवाट लावण्यासाठी सोपे जाईल व त्याच्या अंमलबजावणीमुळे शहर स्वच्छ राहण्यास मदत होईल. त्यासाठी आपण तातडीने पाउलं उचला, असे या पत्रकात कस्पटे यांनी म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांपासून महापालिकेची वृक्ष प्राधिकरण समिती शहरातील वृक्षतोडीस मंजुरी देत आहे, असे वृत्तपत्रांच्या माध्यमातून समोर येत आहे. परंतु, वृक्ष प्राधिकरण समिती नागरिकांचे वृक्षावरील प्रेम वाढवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही. वृक्ष प्राधिकरण समितीने शहरातील नागरिकांना व्यापक प्रमाणात वृक्ष लागवडीसाठी प्रोस्ताहीत करावे. शहरातील वृक्षवाढीसाठी योग्य त्या योजना राबवाव्यात, यासाठी आयुक्तांनी प्रशासनास आवश्यक त्या सूचना द्याव्यात.
– ज्ञानेश्वर संपत कस्पटे (राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते)












