न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ डिसेंबर २०१९) :- फिर्यादी चौहान हे महापालिकेच्या आरोग्य विभागात नोकरीला आहेत. शुक्रवारी त्यांचे पथक दुकानांवर प्लास्टिक बंदीची कारवाई करीत होते. ते वल्लभनगर येथील हिरामोती वाईन्सशॉपमध्ये प्लॅस्टिक बॅग तपासणीसाठी गेले असता आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच, फिर्यादी यांना वाईन्स शॉपमध्ये कोंडून धमकावत सरकारी कामात अडथळा आणला. चौहान यांनी आपल्या वरिष्ठांना माहिती दिल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. शुक्रवारी ( दि . २७) दुपारी एकच्या सुमारास वल्लभनगर, पिंपरी येथे घडली.
याप्रकरणी सुनील हरीश चौहान (५४, रा. घोरपडी, पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संतोष रमेश शिरभाते (वय ४६) आणि रमेश शिरभाते (६५, दोघेही रा. वल्लभनगर, पिंपरी) या बापलेकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, वाईन्स मालकावर गुन्हा दाखल करावा यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संत तुकारामनगर पोलिस चौकीत गर्दी केली. त्यामुळे काही वेळ तणाव निर्माण झाला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर तणाव निवळला. या प्रकरणी पुढील तपास पिंपरी पोलिस करीत आहेत.















