न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ डिसेंबर २०१९) :- धन्वंतरी योजना काय आहे, नव्याने सुरू करण्यात येणारी विमा योजना त्यापेक्षा वेगळी कशी, दोन्ही योजनेतील फरक काय? कुठल्या योजनेमध्ये कामगारांचे हीत जास्त आहे? असे विविध प्रश्न स्थायी सभापतीसह सदस्यांनी वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना विचारले. मात्र संभ्रमावस्थेत असलेले डॉ. पवन साळवे यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाही. त्यामुळे स्थायी समिती सभापती व सदस्यांनी डॉ. साळवे यांना चांगलेच धारेवर धरले. स्थायी समितीची सभा गुरुवारी (दि. २७) सभापती विलास मडिगेरी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
यावेळी पिंपरी – चिंचवड महापालिका सेवेतील सेवानिवृत्त अधिकारी तसेच कर्मचारी यांच्यासाठी योजनेचा विषय घेण्यात आला. न्यू इंडिया एशोरंन्स कंपनी लिमिटेड यांना जीएसटीसह २७ कोटी ८४ लाख ७८ हजार रूपयांच्या विषयाला मान्यता देण्यात आली. या विम्याचा फायदा महापालिकेतील सेवेत कार्यरत असलेले आणि सेवानिवृत्त ११ हजार कर्मचाऱ्यांना होणार आहे. धन्वंतरी योजनेचा लाभ फक्त १९० सदस्यांनी रुग्णालयामध्ये घेता येत होता. त्यामध्ये नामांकित रुग्णालयांमध्ये लाभ नाकारला जात होता. मात्र विमा योजनेमध्ये कुठल्याही रुग्णालयात लाभ घेता येणार आहे. धन्वंतरी योजनेसाठी पुणे जिल्हा अशी मर्यादा होती. जिल्ह्याच्या बाहेरील वैद्यकीय रुग्णालयात उपचार घेता येत नव्हते. रुग्णांना काही आजारांमध्ये ३० ते ६० दिवस औषध गोळ्या देऊन उपचार दिले जातात. मात्र धन्वंतरी योजनेमध्ये औषधे मिळत नव्हती. याउलट विमा योजनेत औषधे – गोळ्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
विमा योजना कॅशलेस आहे. तसेच या योजनेमध्ये दोन हजार शिक्षकांनाही लाभ मिळणार आहे. या दोन्ही योजनेमधील लाभ आणि तोटे याबाबत अधिकारी डॉ. पवन साळवे तसेच डॉ. अनिल रॉय यांना सभेमध्ये विचारण्यात आली होती. त्यावर डॉ. रॉय यांनी विमा योजना कामगारांच्या हिताची असून, त्याचे फायदे जास्त असल्याचे सांगितले. तर डॉ. साळवे यांनी धन्वंतरी योजना चांगली आहे, असे उत्तर दिले. मात्र, धन्वंतरी योजना कशी चांगली आहे, याचे उत्तर त्यांना देता आले नाही. त्यांच्या टुटप्पी धोरणामुळे स्थायी सभापतीसह सदस्यांनी त्यांना धारेवर धरले.
या दोन्ही योजनामधील फायदे तोटे तसेच कामगारांचे हित लक्षात घेऊन या विषयाला मान्यता दिली. तसेच कामगार युनियन अस्तित्वात नसल्याने या विषयांमध्ये संग्रामवस्था होती. त्यामुळे पुढील स्थायीच्या बैठकीमध्ये कर्मचारी, अधिकारी यांच्यामध्ये चर्चा घेण्यात येणार असल्याचे स्थायी सभापती विलास मडिगेरी यांनी सागितले.















