- प्राधिकरण नागरी सुरक्षा समितीच्या पर्यावरण विभागातील पक्षी – कीटक अभ्यासक गटाचा महत्वपूर्ण अहवाल
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ डिसेंबर २०१९) :- सध्या थंडीचा मौसम सुरू झाला आहे. थंडीच्या दिवसांमध्ये फुलपाखरांची लगबग ही वंशवृद्धीकडे व शीतनिद्रेकडे चालू लागते. सर्व फुलपाखरे थंडीचा मौसम अंडी अळी व कोश स्वरूपात घालवतात नैसर्गिक अधिवासाची कमतरता, टेकडयांमधील नैसर्गिक गुहा – कपारी, मोठे वृक्ष यामध्ये होत असलेली घट यामुळे फुलपाखरांनी सुद्धा शितनिद्रेसाठी आपला मोर्चा छोट्या – मोठ्या इमारतींकडे वळविल्याचे पिंपरी चिंचवड शहरात कार्यरत असणाऱ्या प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीच्या पक्षी – कीटक अभ्यास गटाला आढळून आले आहे.
पर्यावरण विभागाचे पक्षी व कीटक अभ्यासक कविता बेंडाळे, अर्चना घाळी दाभोळकर, गौरी सरोदे, देवयानी पाटील, विजय मुनोत, संदीप सकपाळ, मंगेश घाग, राम सुर्वे, जयेंद्र मकवाना, विशाल शेवाळे, राजेश बाबर, तेजस सापरिया, संतोष चव्हाण, अमोल कानु, अमित डांगे, विजय जगताप यांनी समिती अध्यक्ष विजय पाटील यांचे मार्गदर्शनाखाली फुलपाखरांविषयी शहरात काही महत्वपूर्ण निरिक्षणे नोंदवली. या अभ्यास गटाने दिनांक २० डिसेंबर २०१९ ते २५ डिसेंबर २०१९ दरम्यान निगडी, प्राधिकरण, शाहूनगर,चिखली या उपनगरांमध्ये “शीतनिद्रा, फुलपाखरे व त्यामध्ये हॊत असलेले परिवर्तन” या विषयी अभ्यास केला. गेल्या वर्षीही म्हणजेच डिसेंबर ते फेब्रुवारी २०१८ मध्येही या विषयी अभ्यासगटाने निरीक्षण केले होते.
यात अभ्यासातील काही महत्वपूर्ण बाबी आढळून आल्या. पिंपरी चिंचवड शहर परिसर, मावळ, मुळशी या पश्चिम घाटाच्या निगडित असणाऱ्या परिसरालगत असल्याने या परिसरात थंडीचे प्रमाण उत्तम असते. ज्या ज्या भागात थंडी पडत असते अश्या भागातील केसाळ वन्यजीव उदा. खार तसेच किटकांमध्ये फुलपाखरे हे डिसेंबर ते फेब्रुवारी महिन्यां दरम्यान शीतनिद्रा घेत असतात. नर व मादी अंडी म्हणजेच वंशवृद्धीकडे चालू लागतात.(अभ्यासात नर जातीचे पिवळे व मादी जातीचे पांढरे अश्या जोड्या दिसून आल्या)
किटक उन्हाळ्यात अंड्यातून बाहेर पडतात, वनस्पतीची पाने खातात, उन्हाळा वाढल्यानंतर अळ्या कोश बनविण्याच्या अवस्थेत पोहचतात अश्या अवस्थेत ते पावसाळा ऋतू पार करतात व वसंत ऋतूमध्ये ते फुलपाखरामध्ये परिवर्तित होतात. शरद ऋतू म्हणजेच थंडी सुरू झाल्यानंतर ते नसर्गिक अधिवासामधील टेकड्या, कड्या कपारी व नैसर्गिक गुहा व त्यातील नाल्यामधील वरच्या छताला चिकटुन आश्रय घेतात. परंतु वाढत्या शहरीकरणाचा फटका वन्यजीवांना ही बसू लागला आहे. त्यामुळे आता फुलपाखरांचा मोर्चा इमारतीच्या छताकडे वळू लागला आहे. डिसेंबर व जानेवारीमध्ये ही फुलपाखरे वातावरणामध्ये थोडा उष्मा वाढला की इमारतीबाहेर पडतात व संध्याकाळी पुन्हा इमारतींचा सहारा घेतात.या काळात उपाशी राहण्याचीही त्यांची सवयही निदर्शनास आली. या वर्षी उन्हाळा उष्णतामय व पावसाळा चांगला बरसल्यायामुळे फुलपाखरांच्या संख्येमध्ये चांगली वाढ शहरात निदर्शनास आली.
या संदर्भात प्राधिकरण नागरी सुरक्षा कृती समितीचे अध्यक्ष व पर्यावरण अभ्यासक विजय पाटील म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहर हे विविध वन्यजीव, कीटक व पक्ष्यांनी समृद्ध आहे. अनेक तज्ञ त्यांच्या सुरक्षेसाठी शहरात कार्यरत आहेत. अश्याच समितीच्या अभ्यासकांनी “शीतनिद्रा व फुलपाखरे” यांचा अभ्यास २०१८ व २०१९ या दोन वर्षी सलग केला. त्यानुसार अनेक महत्वाच्या बाबी समोऱ आल्या. वाढत्या विकासाबरोबर कीटकसुद्धा त्यांच्या जीवनशैलीमध्ये बदल करत असतात हे फुलपाखरांच्या ह्या कृतीमुळे दिसून आले आहे.















