न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० डिसेंबर २०१९) :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मराठवाड्याला सहा मंत्रिपद मिळाली आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी प्रत्येकी दोन जणांना मंत्रिपदाची संधी दिली आहे. यात काँग्रेसनं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे. तर राष्ट्रवादीनं अपेक्षेप्रमाणे धनंजय मुंडे आणि राजेश टोपे यांना मंत्रिपदाची शपथ दिली आहे. विशेषत: धनंजय मुंडे प्रथमच मंत्रिमंडळात दिसणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीचं सरकार महिनाभरापूर्वी सत्तेत आलं. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर त्यांच्याबरोबर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या प्रत्येकी दोन नेत्यांनी मुख्यमंत्रीपदाची मंत्रिपदाची शपथ घेतली होती.
यात काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि अमित देशमुख यांच्याकडे कॅबिनेट मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. राष्ट्रवादीनं भाजपाच्या नेत्या आणि राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव करून विधानसभेत पोहोचलेल्या धनंजय मुंडे यांना अपेक्षेप्रमाणे कॅबिनेटमध्ये जागा दिली आहे. दुसरीकडे माजी उच्च तंत्र शिक्षण मंत्री राजेश टोपे यांना संधी दिली आहे. तर शिवसेनेकडून पैठणचे आमदार संदीपान भुमरे आणि काँग्रेस सोडून शिवबंधन बांधलेल्या अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिलं आहे. संदीपान भुमरे हे कॅबिनेट मंत्री तर, अब्दुल सत्तार यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.
यात कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख, हसन मुश्रीफ, वर्षा गायकवाड, राजेंद्र शिंगणे, नवाब मलिक, राजेश टोपे, सुनील केदार, संजय राठोड, गुलाबराव पाटील, अमित देशमुख, दादा भुसे, जितेंद्र आव्हाड, संदिपान भुमरे, बाळासाहेब पाटील, यशोमती ठाकूर, अनिल परब, उदय सामंत, के. सी. पाडवी, शंकरराव गडाख, अस्लम शेख, आदित्य ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.
अब्दुल सत्तार, सतेज पाटील, शंभुराजे देसाई, बच्चू कडू, विश्वजीत कदम, दत्तात्रय भरणे, आदिती तटकरे, संजय बनसोडे, प्राजक्त तनपुरे, राजेंद्र पाटील, येड्रावकर यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतली.















