न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० डिसेंबर २०१९) :- राज्यातील सत्ता स्थापनेच्या नाट्याला वेगळं वळण देणारे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार पुन्हा एकदा सत्तेत आले आहेत. आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या कार्यक्रमात अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
अजित पवार यांनी अवघ्या दीड महिन्यात दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चार दिवसांच्या सरकारच्या काळात त्यांनी उपमुख्यमंत्री म्हणून काम केलं.
विधिमंडळ परिसरातील पार्किंगच्या जागेत मुख्य स्टेज आणि त्याला लागूनच भव्य मंडप उभारण्यात आला आहे. याठिकाणी सुमारे ५०० ते ७०० आसनांची व्यवस्था करण्यात आली आहे. या मंडपामध्ये १२ पेक्षा जास्त स्क्रीन उभारण्यात आले असून विधिमंडळ परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
अतिशय नाट्यमयरित्या पहाटे ८ वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर, चारच दिवसांत हे सरकार बहुमताअभावी कोसळले. त्यानंतर दीड महिन्याच्या कालावधीतच आज दुसऱ्यांदा अजित पवार यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्रीपदी शपथ घेतली. मात्र, यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात या पदासाठी शपथ घेतली.















