न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० डिसेंबर २०१९) :- आकुर्डी गावचे ग्रामदैवत श्री खंडोबा यांचा धार्मिक उत्सव बुधवार व गुरुवारी होणार आहे. उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच कुस्ती शौकिनांसाठी आकुर्डी गावातील वसंतदादा पाटील मराठी शाळेच्या पटांगणावर दुपारी 3 वाजता भव्य इनामी कुस्त्यांचा जंगी आखाडा भरणार आहे. कुस्ती शौकिनांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले.
कुस्त्यांच्या लढतीमध्ये पै. प्रसाद सस्ते (मामासाहेब मोहोळ कस्ती संकुल कात्रज महाराष्ट्र चॅम्पियन ज्ञानेश्वर मांगडे यांचा पठ्ठा) विरुध्द पै. अक्षय गरुड (गोकुळ उस्ताद तालिम उपमहाराष्ट्र केसरी संतोष गरुड यांचा पठ्ठा) आणि पै. सागर मोहोळ (खालकर तालीम उपमहाराष्ट्र केसरी राजेंद्र मोहोळ यांचा पठ्ठा) विरुध्द पै. उत्तम विर (गोकुळ उस्ताद तालीम उपमहाराष्ट्र केसरी संतोष गरुड यांचा पठ्ठा) या मुख्य लढती होणार आहेत. तसेच पै. चेतन कंदोरे विरुध्द पै. सचिन पाटील; पै. राजु तांगडे विरुध्द पै. संकेत चव्हाण या कुस्त्यांदेखील आघाड्याचे मुख्य आकर्षण ठरतील. युवा महाराष्ट्र केसरी, एनआयएस कुस्ती कोच पै. किशोर हिरामण नखाते यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
प्रसिध्द कुस्ती निवेदक हंगेश्वर धायगुडे, कोल्हापुरचे प्रसिध्द हलगी सम्राट बापू आवळे हे सेवा देणार आहेत. कै. शंकर विष्णू कुटे यांच्या स्मरणार्थ कैलास गणपत कुटे यांच्याकडून चांदीची गदा, दिलीप खंडू पांढरकर व हर्षवर्धन दिलीप पांढरकर यांच्याकडून रोख ५१ हजार रुपयांचे बक्षिस, कै. पै. सोपान विष्णू काळभोर यांच्या स्मरणार्थ सोमनाथ सोपानराव काळभोर यांच्याकडून चांदीची गदा तसेच स्मृतिचिन्ह अशी बक्षिसांची खैरात विजेत्यांवर केली जाणार आहे. मुख्य लढतींबरोबरच इतर पन्नासहून जास्त कुस्त्या यावेळी होणार आहेत, अशी माहिती ट्रस्टच्या वतीने प्रसिध्दीस देण्यात आली आहे.















