न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ डिसेंबर २०१९) :- दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारांच्या घटनेत वाढ होत आहे. सध्याच्या महिला मानसिक व शारीरिक अत्याचार सहन करीत, जीवन कंठीत आहेत. मात्र, स्वतःवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठीची मानसिक ताकद आज त्यांच्यात नाही. याचे बाळकडू त्यांना विद्यार्थी दशेतच मिळावयास हवे. याकरीता शहरातील शाळांमधील विद्यार्थनींसाठी ज्युडो-कराटेंचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावा. त्यासाठी शहरातील प्रत्येक विभागनिहाय शाळेत विद्यार्थीनींसाठी ज्युडो-कराटे प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यासाठीचे आदेश आयुक्तांनी द्यावेत, अशी मागणी शहर राष्ट्रवादी कार्यकर्ता ज्ञानेश्वर कस्पटे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
आयुक्तांना दिलेल्या निवेदनात कस्पटे यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरात राहणाऱ्या सर्व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या संरक्षणासाठी तसेच त्यांना सक्षम करण्याच्या उद्देशाने शहरातील प्रत्येक प्रभागांमधील शाळेत त्यांच्या आत्मरक्षणार्थ मोफत (कराटे) प्रशिक्षण वर्ग घेणे अत्यंत आवश्यक आहे.
विदयार्थिनीवर होणाऱ्या अत्याचाराची, त्यांच्या दुर्बलतेचा फायदा घेऊन त्यांच्यावर होणाऱ्या हल्ल्यांची परिस्थिती लक्षात घेता, त्यांना स्वतःच्या बचावाकरीता परिस्थितीशी दोन हात करण्याची हिंम्मत मिळाली पाहिजे. या उद्देशाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शाळा व शहरातील खासगी शाळांमध्ये मोफत ज्युडो कराटे प्रशिक्षण वर्ग घेण्याचे सक्तीचे आदेश आयुक्त या नात्याने आपण द्यावेत, असे कस्पटे यांनी या निवेदनात म्हटले आहे.















