न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १ जानेवारी २०१९) :- पिंपरी-चिंचवड शहरात मोकाट कुत्री, भटक्या जनावरांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. गाय, म्हैस, घोडा, गाढव या प्राण्यांच्या रस्त्यांवर वावर वाढला आहे. मुख्यत्वे करुन अंतर्गत रस्ते, जुना पुणे-मुंबई महामार्ग, बाजारपेठा, उद्याने इत्यादी परिसरात ठिकाणी जनावरांचा मोठ्या प्रमाणात उपद्रव होत आहे.
महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाद्वारे जनावरे पकडण्याची मोहीम हाती घेतली आहे. आजपर्यंत १६ मोकाट जनावरे पकडली आहेत. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांच्या नियंत्रणाखाली विशेष पथक स्थापन करण्यात येणार आहे.
या पथकामार्फत आजपासून रात्री दहा ते सकाळी सहा या कालावधीत मोकाट जनावरे पकडण्याची कारवाई तीव्र केली जाणार आहे. त्यामुळे जनावरे मालकांनी आपली जनावरे बंदिस्त करुन ठेवावीत. शहरात सार्वजनिक ठिकाणी त्यांचा वावर होणार नाही. याची दक्षता घेण्याचे आवाहन महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाने केले आहे.












