न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जानेवारी २०१९) :- पिंपरी कॅम्पमधील वाहतूक कोंडी, रस्त्यावरील अतिक्रमणे हटवावित. त्यातून मार्ग काढण्याची विनंती पिंपरी व्यापारी असोसिएशनने खासदार बारणे यांच्याकडे केली होती. त्यानुसार बारणे यांनी आज (बुधवारी) सकाळी वाहतूक पोलीस, आरटीओचे अधिकारी आणि महापालिका अधिका-यांसमवेत पिंपरी कॅम्पमधील वाहतूक समस्येची पाहणी केली.
वाहतूक विभागाच्या सहाय्यक आयुक्त निलिमा जाधव, पिंपरीचे पोलीस निरीक्षक प्रदीप लोंढे, आरटीओचे निरीक्षक पांढरे, महापालिकेचे कार्यकारी अभियंता शिरिष पोरेड्डी, पिंपरी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष शिवादास पमनानी, शिवसेनेचे शहरप्रमुख योगेश बाबर आदी उपस्थित होते.
पिंपरी कॅम्पातील रस्त्यावरील अतिक्रमणे तातडीने हटविण्यात यावीत. पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी. कॅम्पातील वाहतूक कोंडी सुरळित करण्याच्या सूचना शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी पोलीस, महापालिका अधिका-यांना दिल्या आहेत. पिंपरीतील डाई-ची कंपनीच्या प्लॉटची लेवल करुन पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करुन द्यावी. महापालिकेचे वाहनतळाचे आरक्षण तातडीने विकसित करावे, असे निर्देशही बारणे यांनी दिले आहेत.












