पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या प्रसुती रुग्णालयांतील ताण यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयावर (वायसीएमएच) पडत असल्याने अनेक बाळांतनींची गैरसोय होते. ही गैरसोय रोखण्यासाठी महापालिका आयुक्तांनी आरोग्य विभागाला सात दिवसांच्या आत आदीत्य बिर्ला स्मृती रुग्णालयाबरोबर (एबीएमएच) करारनामा करण्याचे आदेश दिले आहेत.
या करारनाम्यानुसार महापालिकेच्या आकुर्डी, सांगवी, थेरगाव, तालेरा, जिजामाता, यमुनानगर व भोसरी रुग्णालयात प्रसुतीसाठी दाखल होणाऱ्या महिलांना रात्री आठ ते सकाळी आठ या वेळेत उद्भवणाऱ्या तातडीच्या उपचारांसाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात हलविण्यात येते. वायसीएमएचमध्ये पुर्वीपासूनच उपचारासाठी आलेल्यांची गर्दी व त्यातून या सातही रुग्णालयांतून शिफारशीने दाखल झालेल्या रुग्णांचा मोठ्या प्रमाणावर रुग्णालयीन कामावर ताण येतो. यामुळे अनेक वेळा लेबर रुममध्ये जागा उपलब्ध होत नाही. यामुळे एबीएमएचने वायसीएमएचला पुढील तीन महिन्यांसाठी रुग्णांची मोफत तपासणी व उपचार देण्याचा प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला आज अखेर महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी मान्यता दिली.
याबाबत आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिलकुमार रॉय यांनी सांगितले की, महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या स्त्री रुग्णांना रात्रीच्या वेळी प्रसुतीमध्ये अडचण उद्भवल्यास असे रुग्ण एबीएमएचकडे रेफर करण्यासाठी मान्यता दिली आहे. महापालिकेद्वारे प्रसुतीसाठी एबीएमएचमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांकडून अथवा नातेवाईकांकडून कोणत्याही स्वरुपाचा खर्च आकारण्यात येणार नाही. उपचार अथवा तपासणीचा खर्च आकारल्याची तक्रारी प्राप्त झाल्यास करार रद्द करण्यात येईल. तसेच सध्या वायसीएमएचमध्ये उपलब्ध नसलेला कॅन्सर सेवा देखील एबीएमएच पुरवणार आहे.












