- बेकायदेशीर अदला-बदलामुळे करोडो रुपयांचा आर्थिक घोटाळा
- घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील यांचा आरोप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०१९) :- काळेवाडी फाटा ते फुगेवाडीपर्यंतच्या मुख्य एचसीएमटीआर डीपीच्या रूटमध्ये हेतुपूर्वक बेकायदेशीरपणे बदल करून, कोकणे चौकापासून कासारवाडीपर्यंतचा सरळ रस्ता नागमोडी केलेल्याचे निदर्शनास आले आहे, असा आरोप घर बचाव संघर्ष समितीचे मुख्य समन्वयक विजय पाटील यांनी केला आहे. तसेच याबाबतचे स्पष्टीकरण महापालिकेच्या अभियंत्यांनी देण्याची मागणीही प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात पाटील यांनी म्हटले आहे की, १९९५ च्या अंतिम डी पी अहवालातील पान क्रमांक २३३, २४० वरील प्लॅन नकाशा क्रमांक ३१ नुसार असे स्पष्ट दिसून येते की, नकाशामध्ये पालिका अभियंत्यांनी हेतुपूर्वक बेकायदेशीरपणे बदल केलेला आहे. बीआरटी व एचसीएमटीआर च्या रूट मध्ये अदलाबदल करून कोकणे चौकापासून कासारवाडी पर्यंत जाताना सरळ रस्ता नागमोडी केलेला आढळून आलेला आहे, असे पाटील यांनी म्हटले.
तसेच काळेवाडी फाटा ते फुगेवाडी पर्यंतच्या मेन एचसीएमटीआर डी पी च्या रूट मध्ये कोणी बदल केला याची माहिती अभियंत्यांनीच स्पष्ट करावी. डी पी आरेखीत नकाशामध्ये दाखविल्याप्रमाणे काळेवाडी फाटा ते जगताप डेअरी ते फुगेवाडी असा रूट असताना त्या रूट मध्ये बदल करून रहाटणी सर्व्हे नंबर २५ च्या मध्यावरून वळवून तो रहाटणी सर्व्हे न. २८ मधून कोकणे चौकाकडे नेऊन तो नाशिक फाट्यावरून ४५ मीटर बी आर टी रोडच्या उत्तर बाजूस टाकण्यात आला. म्हणजेच काय ४५ मीटर बीआरटी रस्त्याच्या जागेवर एचसीएमटीआर रस्ता बनविला व एचसीएमटीआर च्या जागेवर बीआरटी रस्ता बनविला, असे का केले? याबाबत पालिका अभियंत्यांनी व नगररचना विभागाने स्पष्टीकरण द्यावे, असे पाटील यांनी म्हटले.
अश्या बेकायदेशीरपणे केलेल्या अदलाबदलामुळे करोडो रुपयांचा आर्थिक घोटाळा झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महापालिकेचा मोठा महसुलही बुडालेला आहे. एचसीएमटीआर व बीआरटी रस्ता पूर्ण बनण्याच्या अगोदरच लगतच्या बांधकाम व्यवसायिकांना मोठा आर्थिक लाभ मिळवून देण्यात आला. ह्यामध्ये पालिका अभियंत्यांच्या प्रत्यक्ष सहभाग दिसून येत आहे. एकाच एचसीएमटीआर च्या रूटमध्ये (काळेवाडी फाटा ते फुगेवाडी) १९९५ च्या मूळ डीपी मध्ये नियमबाह्य तीन वेळा बदल केले केले गेले. हे बदल का केले गेले व कोणाचे हित जोपासण्यासाठी केले गेले हे पालिका अभियंत्यांनी व नगररचनाकार यांनी स्पष्ट करावे. या संदर्भात आयुक्तांनीही सखोल चौकशी करून दोषी अभियंत्यांवर तात्काळ कारवाई करावी. अश्या पद्धतीने महाराष्ट्र शासनाची, राईट कंपनी व महामेट्रोचीही पालिका अधिकाऱ्यांनी हेतुपूर्वक चुकीची माहिती देऊन पूर्णतः दिशाभूल केलेली आहे. महाराष्ट्र शासनाच्या मूळ डीपी आरेखनमध्ये व राईट कंपनीच्या मूळ एचसीएमटीआर आरेखन मध्ये नियमबाह्य बदल केलेला आहे, असे पाटील यांनी म्हटले.
एचसीएमटीआर बाधित काळेवाडी फाटा ते कासारवाडी दरम्यानच्या रहिवाश्यांनी सदर बेकायदेशीर बदलांबाबत उच्च न्यायालयामध्ये पिटीशन दाखल केलेल्या आहेत. सदर बाब सद्यस्थितीत न्यायप्रविष्ट असताना न्यायालयाच्या परवानगीशिवाय खाजगी जमीन मालकांच्या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे प्रकल्प काम सुरू करणे बेकायदेशीरच ठरते. महामेट्रोस कायदेशीर न्यायप्रविष्ट पिटीशन बाबत माहिती न देता अभियंत्यांनी महामेट्रो राईट कंपनीची फसवणूक केलेली आहे. १५ नोव्हेबर २०१९ च्या मिनिट्स ऑफ मिटिंग मध्ये सदर न्यायप्रविष्ट बाबींची माहिती दोनही संस्थांना देणे क्रमप्राप्त होते. तसेच १६ नोव्हेबर च्या प्रत्यक्ष पाहणीमध्ये रहाटणीमधील कायदेशीर न्यायप्रविष्ट बाबींची माहिती न दिल्याने डीपीआर आरेखन अलायमेंट चुकण्याची शक्यता आहे. महापालिकेचे ६ कोटी रुपये पाण्यात जाण्याची शक्यता आहे व प्रकल्पही रेंगाळण्याची शक्यता आहे. याबाबत माननीय मुख्यमंत्री यांनी जातीने लक्ष घालून दोषी महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, असे पाटील यांनी या पत्रकात म्हटले आहे.











