- १५ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास पाणी रोको आंदोलन – ज्ञानेश्वर कस्पटे
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जानेवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड शहराला नियोजनाशिवाय अतिरिक्त १०० दशलक्ष लीटर्स (एमएलडी) अधिकचे पाणी उपलब्ध होत नाहीत. तसेच, ४० टक्के पाणी गळती पूर्णपणे थांबविली जात नाही. तोपर्यंत शहरातील दिवसाआड पाणीपुरवठा कायम राहणार आहे, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सोमवारी (दि. २७) रोजी पत्रकारांशी बोलताना सांगितले. प्रशासनाच्या व सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या अकार्यक्षमतेमुळेच नागरिकांच्या माथी पाणी कपात मारली जात आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका सध्या पवना धरणातून दररोज ४८० ते ४९० एलएलडी पाणी उचलत आहे. एमआयडीसीकडूनही ३० एमएलडी पाणी उचलत आहोत. असे एकूण ५१० ते ५२० एमलएलडी पाणी महापालिका घेत आहे. यामध्ये ४० टक्के गळती म्हणजेच सुमारे २०० एमलएलडी पाण्याची दररोज गळती होते. पाणीपुरवठा व वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी २५ नोव्हेंबर २०१९ ते २५ जानेवारी २०२० या दोन महिन्यांच्या कालावधीत ठोस उपाययोजना केल्या जातील, असा दावा करीत आयुक्त हर्डीकर यांच्या आदेशावरून शहरात २५ नोव्हेंबरपासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला होता. या दोन महिन्यांच्या कालावधीत अनधिकृत नळजोड धारकांवर कारवाई करणार, गळती रोखणार, पाण्याचे नवे स्रोत वाढीसाठी प्रयत्न करणार, कामचुकार अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करणार, पाणीपुरवठा विभागास अतिरिक्त मनुष्यबळ देणार, वीजेप्रमाणे पाण्याचे दर वाढते ठेवणार, जलशुद्धीकरण व अशुद्ध उपसा केंद्राची क्षमता वाढविणार, बांधकाम व्यावसायिकांवर बंधने आणणार, असे अनेक दावे आयुक्तांनी केले होते.
आयुक्तांनी केलेले हे भरमसाठ दावे फोल ठरल्याचे पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजावरून स्पष्ट होत आहे. दोन महिन्यांची मुदत पूर्ण झाल्याने ही कपात मागे घेतली जाईल, अशी नागरिकांना अपेक्षा होती. मात्र, दिवसाआड पाणीपुरवठा करण्यास आयुक्तांनी साफ नकार दिला आहे. शहरासाठी पाण्याचे नवे स्त्रोत निर्माण होत नाहीत. तसेच, ४० टक्के पाणी गळती पूर्णपणे रोखली जात नाही. तोपर्यंत दिवसाआड पाणीपुरवठा बंद केला जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. भामा आसखेड धरणातून महापालिकेला १६६ एमएलडी व आंद्रा धारणातून १०१ एमएलडी पाणीपुरवठा मागील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेले आहे. भामा आसखेडच्या १६६ एमएलडी पैकी १०० एमएलडी पाणी इंद्रायणी नदीवरील देहू बंधाऱ्यातून घेण्याचे नियोजन आहे. मात्र याबाबत कोणताही ठोस प्रयत्न महापालिकेत सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसह पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेला दिसत नाही. हे त्यांचे अपयश आहे.
महापालिका आयुक्त हर्डीकर यांनी घेतलेला निर्णय अपयश लपविण्यासाठी केला आहे. ३० एमएलडी पाणी शहरवासियांना मिळण्यासाठी आयुक्तांनी गेल्या दोन महिन्यात काय ठोस निर्णय घेतले हे अजूनही स्पष्ट नाही. नेमलेल्या सल्लागार संस्थानी याबाबत काय दिवे लावले. या सल्लागार संस्थांना पोसण्यासाठी ते महापालिकेचे जावई आहेत? आयुक्तांना नागरिकांपेक्षा ठेकेदार पोसायचे आहेत. आयुक्तांना नागरिकांच्या प्रश्नाबाबत नागरिकांना भेटण्यास वेळ नाही. करदात्या नागरिकांप्रती थोडीशीही काळजी असेल तर त्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी आयुक्तांनी कर्तव्यदक्ष रहावे. येत्या १५ दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास शहरातील एकाही पाण्याच्या टाकीतून पाणीपुरवठा होऊ देणार नाही.
– ज्ञानेश्वर संपत कस्पटे ( राष्ट्रवादी कार्यकर्ता)















