न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जानेवारी २०२०) :- त्याग आणि बलिदान या दोन गोष्टींवर स्वतंत्र भारत आज उभा आहे. देशासाठी समर्पण करणाऱ्या प्रत्येक सैनिकाचा आदर्श आजच्या विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे प्रतिपादन लेप्टीनंट जनरल अजय गुप्ता यांनी केले.
दिघीतील आर्मी पब्लिक स्कूल व जुनिअर कॉलेजमध्ये २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लेप्टीनंट जनरल अजय गुप्ता, डॉ. रोहिणी अजय गुप्ता यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. प्राचार्य यस्मीन कौर व उपस्थित विद्यार्थी, कॉलेजमधील शिक्षकांनी ध्वजास मानवंदना दिली.
कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी ‘आम्ही भारतीय नागरिक’ या संकल्पनेवर आधारित विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात “तेरी मिट्टी मे मिल जावन” या संगीताने झाली. भारतीय संगीताच्या लयबद्ध चालीवर विद्यार्थ्यांनी “माँ तुझे सलाम” हे नृत्य सादरे केले. त्यास उपस्थितांची वाहवा मिळाली. माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या ‘इंडिया व्हिजन २०२०’ चे विद्यार्थ्यांनी कलात्मक पद्धतीने चित्रण केले.
प्राचार्या यस्मीन कौर यांनी विद्यार्थ्यांना देशाचे जबाबदार नागरिक बनण्याचे आवाहन केले. तसेच विद्यार्थ्यांना देशाबद्द्दल अभिमान जागा ठेवून देशहितासाठी कायम कटिबद्ध रहावे, असे सांगितले.