- महिलांना व्यक्त होण्यासारखं दुसर व्यासपीठ नाही – माजी नगरसेविका अनितामाई तापकीर…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३ फेब्रुवारी २०२०) :- काळेवाडी-रहाटणीतील मा. श्री. मच्छिंद्र तापकीर सोशल फाऊंडेशन यांच्या वतीने शनिवारी (दि. ०१) रोजी तापकीरनगर, श्रीनगर, काळेवाडी, रहाटणी परिसरातील महिला भगिनींसाठी हळदी – कुंकु व तिळगुळ समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेतील अपुर्वा चौधरी या होत्या. अपूर्वा चौधरी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी आयोजिका माजी नगरसेविका सौ. अनितामाई मच्छिंद्र तापकीर यांनी विविध वस्तू स्वरुपात महिलांना वाण वाटप केले. यावेळी सौ. बेबीताई मोहन तापकीर, सौ. स्वाती सोमनाथ तापकीर, सौ. मृणाली रूपेश तापकीर, शोभा पवार, राजेश्वरी मोरे व परिसरातील ५००० हून अधिक महिला-भगिनी उपस्थित होत्या.
महिलांना खऱ्या अर्थाने घरगुती कामाच्या ताण-तणावातून जराशी उसंत मिळावी यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमानिमित्त चंद्रकांत नगरकर प्रस्तुत ‘स्टार ऑफ इंडिया’ हा आर्केस्ट्रा उपस्थितांची वाहवा मिळवून गेला.
माजी नगरसेविका अनितामाई तापकीर यांनी ‘सुवासिनी महिला एकत्र येऊन हळदी-कुंकाचा समारंभ साजरा करतात. दैनंदिन कामापासून काहीसा विरंगुळा म्हणून महिला या निमित्ताने एकत्र येतात. हळदी-कुंकवाच वाण लुटत, एकमेकींच्या आयुष्यात सुख-समाधान नांदाव, याकरीता एकमेकींसोबत संवादाद्वारे मनातील भावना व्यक्त करतात. सामाजिक भान जपण्यासाठी अशा कार्यक्रमाद्वारे महिलांना व्यक्त होण्यासारखं दुसर व्यासपीठ नाही, असं मत व्यक्त केलं.
मा. श्री. मच्छिंद्र तापकीर सोशल फाऊंडेशन आयोजित हा महिला-भगिनींचा हळदी-कुंकू समारंभ अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.