न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ फेब्रुवारी २०२०) :- पाणीटंचाईच्या कारणावरून कासारवाडी येथील पाण्याच्या टाकीखाली भाजपा नगरसेविका आशा शेंडगे यांनी आणि तेथील महिलांनी महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवल्याच्या घटनेचे पालिका कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र पडसाद उमटले आहेत. या प्रकरणाचा निषेध करत कर्मचारी महासंघासह ४९ अभियंत्यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देत या घटनेचा निषेध नोंदविला आहे.
पिंपरी – चिंचवड शहरातील नागरिकांना गेल्या आठ ते दहा महिन्यांपासून पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. वारंवार मागणी करून तसेच निवेदने देऊनही पाणीपुरवठा अधिकारी त्याची दखल घेत नसल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. कासारवाडी येथे सलग दोन ते तीन दिवस पाणीपुरवठा न झाल्यामुळे नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला होता. पाणीपरवठ्याबाबत नागरिकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी नगरसेविका शेंडगे यांनी सहशहर अभियंता मकरंद निकम यांच्यासह काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीच्या खाली चार तास कोंडून ठेवले होते.
या घटनेचा कर्मचारी महासंघ व अभियंत्यांनी निषेध करत मंगळवारी आयुक्तांना निवेदन दिले. नियमानुसार व कायदेशीर पद्धतीने कारवाई करण्यास आमची हरकत नसून आशा शेंडगे यांनी केलेला प्रकार निषेधार्ह आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.















