- दिरंगाईबाबत महापालिकेची दिवसाला दंड आकरणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ फेब्रुवारी २०२०) :- आळंदी – पुणे या पालखी मार्गावर वडमुखवाडी येथे संत ज्ञानेश्वर महाराज व संत नामदेव महाराज यांच्या भेटीचे समूहशिल्प उभारण्याच्या कामास दिरंगाई केल्याने पिंपरी – चिंचवड पालिकेने संबंधित ठेकेदाराला १ एप्रिल २०१८ पासून दररोज १ हजार रुपये दंड केला आहे. महापालिकेने आजपावतो २२ महिन्यांत तब्बल ६ लाख ६० हजारांचा दंड ठेकेदाराला आकारला आहे.
या कामाचे भूमिपूजन तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एक हस्ते २५ मे २०१३ ला करण्यात आले होते. कामाची मुदत मार्च २०१७ ला संपली. मुदतवाढ देऊनही काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे १ एप्रिल २०१८ पासून ठेकेदाराला दर दिवशी १ हजार रूपये दंड केला जात आहे. अद्याप हे काम अपूर्ण स्थितीत आहे. हा दंड ठेकेदाराच्या बिलातून वजा केला जात आहे.
समूहशिल्पात संत ज्ञानेश्वर महाराज, संत निवृत्ती महाराज, संत सोपानदेव महाराज, संत मुक्ताबाई, तीन मृदुंगधारी, दोन ध्वजधारी, एक चिपळीवाला, एक टाळकरी, वारकरी असा एकूण २५ जणांच्या कांस्य धातूच्या मूर्ती आहेत.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाच्या कला संचालनालयाकडून मंजुरी मिळण्यास विलंब झाल्याने कामास उशीर झाल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी माहिती देताना सांगीतले.















