- महापालिकेची नवीन इमारत दर्शनी भागातच हवी – अजित पवार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी – चिंचवड महापालिकेची प्रशासकीय नवी इमारत पिंपरीतील गांधीनगर येथे बांधण्यात येणार होती. मात्र, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी शहराच्या दर्शनी भागात इमारत बांधण्याचे आदेश आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे गांधीनगर ऐवजी नव्या जागेचा शोध पालिका प्रशासनाने सुरू केला आहे. त्यासाठी इमारत बांधकाम निविदा प्रक्रियेची प्री – बिडमिटींग २० दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आली आहे.
सध्याची पुणे – मुंबई जुन्या महामार्गावरील पालिका भवनाची मुख्य प्रशासकीय इमारत कामकाजासाठी अपुरी पडत आहे. त्यामळे नवी प्रशस्त इमारत बांधण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. गांधीनगर येथील महिंद्रा कंपनीकडून मिळालेल्या ‘ आयटूआर ‘ च्या जागेपैकी साडेचार एकर जागेत ९ मजली पर्यावरणपुरक इमारत बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.
या इमारतीमध्ये पालिकेचे सर्व विभाग हलविण्यात येणार आहेत. इमारतीच्या बांधकामासाठी २०० कोटींचा खर्च अपेक्षित होता. इमारतीच्या आराखड्याबाबत महापौर, उपमहापौर, सर्व गटनेते व प्रमुख पदाधिकाऱ्यांसमोर १७ डिसेंबर २०१९ ला सादरीकरण करण्यात आले. इमारतीबाबत पदाधिकारी व गटनेत्यांनी काही बदल सुचविले. त्यानुसार आराखड्यात बदल करण्यात आले. त्यामुळे या खर्चात ९९ कोटींची भर पडली. या वाढीव खर्चास १० जानेवारीला झालेल्या सर्वसाधारण सभेत उपसूचनेद्वारे मंजुरी देण्यात आली. इमारतीच्या बांधकामासाठी अंदाजे २४६ कोटी खर्चाची निविदा पालिकेने १९ जानेवारीला प्रसिद्ध केली आहे.
इमारत बांधण्याच्या पालिकेच्या या अतिघाईबद्दल पालकमंत्री अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एका बैठकीत पवार यांनी या कारणांवरून आयुक्त श्रावण हर्डीकर यांची कानउघाडणी केली. नवी प्रशासकीय इमारत बांधण्यास विरोध नसून, ती इमारत दर्शनी भागात असावी. पुणे महापालिकेच्या इमारतीप्रमाणे ती चारी बाजूने शोभून दिसेल, अशी असावी. पुढील ३० ते ४० वर्षांचा विचार करून ती इमारत आकर्षक, सुंदर व दर्शनीय असायला हवी. विद्युत रोषणाई केल्यानंतर नागरिकांना ती इमारत ‘ येता – जाता दिसायला हवी. त्यानुसार निविदा प्रक्रियेत बदल करा, अशा सक्त सूचना पवार यांनी दिल्या आहेत.
गांधीनगर, पिंपरी येथील जागा दर्शनी भागात नाही. चारीबाजूने उंच खासगी इमारती व पाण्याची टाकी आहे. दर्शनी भागासाठी केवळ १२ मीटर रूंदीचा रस्ता आहे. त्यामुळे या ठिकाणी नवी इमारत उभारण्यास विरोध होत आहे. त्याची दखल घेऊन पालकमंत्री पवार यांनी आयुक्तांना वरील स्पष्ट सूचना केल्या आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली. पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार पालिका प्रशासनाने तत्काळ अंमलबजावणी सुरू केली आहे. निविदा प्रक्रियेत प्रशासनाने लगोलग काही बदल केले आहेत. निविदेसंदर्भात ७ फेब्रुवारीला प्री – बिड मिटींग होणार होती. ती २० दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. नव्या जागेमुळे इमारतीच्या आराखड्यात काही बदल झाल्यास तसे बदल निविदा अटी व शर्तीमध्ये केले जाणार आहेत. परिणामी, इमारतीच्या खर्चात आणखी भार पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
नव्या दर्शनी जागेसाठी पालिका प्रशासनाने शोध मोहिम हाती घेतली आहे. त्यानुसार चिंचवड येथील सायन्स पार्क येथील सिटी सेंटरची जागा, ‘ आयटीआर ‘ अंतर्गत पुणे-मुंबई जुन्या महामार्गावरील दर्शनी भागातील ताब्यात आलेली जागा शोधण्यात येत आहेत. तसेच, खासगी जागा विकत घेण्याचा पर्यायही तपासला जात आहे. जुन्या पुणे – मुंबई महामार्गावरील जागेस प्राधान्य कायम ठेवून नवी जागा शोधण्याची कार्यवाही पालिका प्रशासनाने सुरू केली आहे. त्यामुळे नवी प्रशासकीय इमारत होणार हे नक्की झाले आहे. शक्यतो पुणे – मुंबई जुन्या महामार्गावरील जागेस प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे नवी इमारत रस्त्यावरून ये – जा करणाऱ्या नागरिक व वाहनचालकांच्या दृष्टीस पडणार आहे. परिणामी, शहराच्या सौदर्यात भर पडणार आहे. दरम्यान, नवी इमारत झाल्यानंतर पालिकेची सध्याची इमारत व्यापारी संस्थेला भाडेतत्वावर देण्याचे नियोजन आहे. त्यातून पालिकेस भरघोस उत्पन्न मिळणार आहे.















