- ‘पिंपरी चिंचवड – पुणे मेट्रो’ नामकरणाबाबत महापालिकेच्या सभेत ठरावाची गरज – महामेट्रो
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी-चिंचवड शहरात दापोडी ते चिंचवडच्या मदर टेरेसा उड्डाणपुलापर्यंत मेट्रोचे काम वेगात सुरू आहे. या कामासोबतच निगडीच्या भक्ती शक्ती समुह शिल्प चौकापर्यंत मेट्रो मार्गिकचे काम पूर्ण करावे, अशी सूचना पिंपरी – चिंचवड महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
महामेट्रोचे अधिकारी, पालिकेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांची बैठक मंगळवारी (दि. ४) आयुक्त दालनात झाली. या वेळी महापौर उषा ढोरे, उपमहापौर तुषार हिंगे, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, आयुक्त श्रावण हर्डीकर, महिला व बाल कल्याण समिती सभापती निर्मला कुटे, नगरसेवक राजेंद्र गावडे, मोरेश्वर शेडगे, माजी नगरसेवक राजू दुर्गे, शहर अभियंता राजन पाटील, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, कार्यकारी अभियंता ज्ञानदेव जुंधारे, महामेट्रोचे कार्यकारी संचालक गौतम बि-हाडे आदी उपस्थित होते. मेट्रोचे काम लवकरात लवकर पूर्ण करून रस्ते वाहतुकीस खुले करावे.
विशेषतः पालिका भवनासमोरील काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे, अशी सूचना यावेळी करण्यात आली. मेट्रोच्या ठेकेदाराने सर्व रस्ते आपल्या मालकीचे असल्याप्रमाणे काम करू नये, अशा सक्त सूचना पदाधिकाऱ्यांनी दिल्या. पिंपरी – चिंचवड महापालिका भवन मेट्रो स्टेशनला पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर असे नावे देण्याची मागणीही बैठकीत करण्यात आली.
बिऱ्हाडे यांनी येत्या २ महिन्यात काम पूर्ण करून सर्व रस्ते वाहतुकीस खुले जातील. त्यामुळे वाहनचालकांची समस्या सुटण्यास मदत होणार आहे. पदाधिकाऱ्यांच्या सुचनांनुसार कार्यवाही केली जाईल.
पिंपरी – चिंचवड शहराचे नाव प्रथमस्थानी हवे पिंपरी – चिंचवड व पुणे शहरातून धावणाऱ्या मेट्रोला ‘ पुणे मेट्रो ‘ असे नाव देण्यात आले आहे. त्या नावात पिंपरी चिंचवड शहराचा प्रथम उल्लेख करावा. ‘पिंपरी चिंचवड – पुणे मेट्रो’ असे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी महापौर उषा ढोरे यांनी केली. त्या दृष्टीने कारवाई केली जाईल, अशी ग्वाही अधिकाऱ्यांनी दिल्याचे महापौरानी सांगितले.
‘पिंपरी चिंचवड – पुणे मेट्रो’ नामकरणाबाबत महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव केल्यास त्यानुसार कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असेही महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सांगीतले.















