न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड शहरातील सर्व टपरी पथारी हातगाडी धारकांचे सर्वेक्षण करावे, अतिक्रमण कारवाई थांबवावी, पक्या गाळ्यात पुनर्वसन करावे. हॉकर्स झोन निर्माण करावे, नवीन व्यक्तीला लायसन देण्यात यावे, यासह इतर विविध मागण्यांसाठी मंगळवार दिनांक (११) रोजी सकाळी ११.०० वाजता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे.
टपरी-पथारी हातगाडी पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येणार असून, कार्याध्यक्ष बळीराम काकडे, सचिन प्रल्हाद कांबळे, शहर अध्यक्ष रमेश शिंदे, गणेश आहेर आदी उपस्थित राहणार आहेत.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने २००७ मध्ये टपरी-पथारी हातगाडीधारकांसाठी कायदा केला यास पंधरा वर्ष होत आहेत. परंतु, अजून एकही हॉकर्स झोन शहरात झाले नाही. धोरण कागदावरच राहिले, अशी टीका बाबा कांबळे यांनी नुकतीच केली होती. टपरी-पथारी-हातगाडी पंचायत वतीने फेरीवाला जागृती अभियान राबविण्यात आला आहे. या अभियानात टपरी-पथारी-हातगाडी धारकांनी उत्तम प्रतिसाद दिला असून, मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि मोर्चा काढण्याच्या सूचना केल्या. यामुळे हा मोर्चा काढण्यात आला असून, मोर्चात टपरी-पथारी-हातगाडीधारकांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे अहवाल पंचायत सचिव प्रल्हाद कांबळे यांनी केले आहे.