न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० फेब्रुवारी २०२०) :- हिंगणघाटमधील पीडितेचा संघर्ष अखेर थांबला असून शोकाकुल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ आणि इतर लोक उपस्थित होते. अंत्यसंस्काराआधी नातेवाईकांनी लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका घेतली होती. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. याआधी मृतदेह स्वीकारण्यासही नकार देण्यात आला होता. मात्र गृहमंत्र्यांनी आश्वासन दिल्यानंतर तो स्वीकारण्यात आला.
हिंगणघाट जळीतकांडातील पीडितेचा सोमवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला. महाविद्यालयात प्राध्यापक असणाऱ्या तरुणीवर आरोपी विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवून दिलं होतं. मागील सोमवारी ही घटना घडली होती.
हिंगणघाटमधील पीडितेच्या मृत्यू झाल्यानंतर गावात तणाव निर्माण झाला होता. संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरुन निषेध व्यक्त करण्यास सुरुवात केली होती.












