न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी-चिंचवड अग्निशमन विभागाला मंगळवारी सकाळी सव्वादहा वाजता नारायण हुले यांनी सागर प्लाझा कासारवाडी येथे दोघेजण घरात अडकल्याची माहिती दिली. मुख्य अग्निशमन केंद्राचे जनरल अरुण कुमार वैद्य, लिडिंग फायरमन संजेश ठाकूर, वाहन चालक विशाल फडतरे, फायरमन विजय घुगे, संभाजी दराडे, दिलीप गायकवाड, प्रशिक्षणार्थी उपस्थानक अधिकारी लक्ष्मण बेदरे, नयन कदम, दीपेश पाटील आदींनी घटनास्थळी धाव घेतली.
नाशिक फाट्याजवळ असलेली सागर प्लाझा इमारतीमध्ये चौथ्या मजल्यावर मुलगा घरात अडकल्याचे सुरुवातीला जवानांना समजले. त्यानंतर मुलाची आई देखील घरात असून त्या बाथरूममध्ये अडकल्याची माहिती मिळाली. आई बाथरूममध्ये असताना एक वर्षाच्या चिमुकल्याने खेळत खेळत बाथरूमच्या बाहेर जाऊन बाथरूमला बाहेरून कडी लावली. त्यामुळे पल्लवी बाथरूममध्ये अडकल्या.
दरम्यान, पल्लवी यांनी घराचा दरवाजा आतून बंद केला होता. त्यामुळे बाहेरून घरात कोणीही येऊ शकत नव्हते. जवानांनी घराचा दरवाजा तोडून मुलाची आणि आईची सुखरूप सुटका केली. पाऊण तासात दोघांची सुटका करून अग्निशमन विभागाचे जवान परतले. ही घटना मंगळवारी (दि. ११) सकाळी कासारवाडी येथे घडली. पल्लवी मंगेश पानसरे (वय २७, रा. गोयल सोसायटी, सागर प्लाझा, कासारवाडी) आणि आदी मंगेश पानसरे (वय १) अशी सुटका केलेल्या मायलेकाची नावे आहेत.















