न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ फेब्रुवारी २०२०) :- पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये अनेक मिळकतधारकांनी मोठ्या प्रमाणावर कर थकवला आहे. एक लाखाच्यावर थकबाकीधारकांना थकबाकीसह मिळकत कर भरण्याची नोटीस देण्यात आली आहे. त्यानंतर आठ दिवसांच्या आत रक्कम जमा न केल्यास मालमत्ता जप्तीचा इशारा, आयुक्तांनी दिला आहे.
शहरात एकूण ५ लाख २५ हजार मिळकतीची नोंद आहे. त्यापैकी एक लाखांवरील मोठ्या थकबाकीधारकांची संख्या १९ हजार ९९३ इतकी आहे. थेरगाव कर संकलन कार्यालयाकडे सर्वाधिक ३ हजार ९४९ मोठे थकबाकीदार आहेत. त्या पाठोपाठ चिखली कार्यालयाकडे ३ हजार ३३८ आणि भोसरी कार्यालयाकडे १ हजार ८९८ मोठे थकबाकीदार आहेत. एक हजारपेक्षा अधिक थकबाकीदार असलेल्या कर संकलन कार्यालयाची संख्या ६ असून पाचशेपेक्षा अधिक थकबाकीदार असलेल्याकेवळ २ आहे.
महापालिकेच्या सर्व १६ विभागीय संकलन कार्यालयाकडून १ लाख व त्यापेक्षा जास्त थकबाकी असलेल्या मिळकतधारकांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. नोटीस मिळाल्यानंतर आठ दिवसांच्या आत त्यांनी थकबाकीसह संपूर्ण मिळकत कर न भरल्यास मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाणार आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी कर संकलन विभागाला वसुली मोहीम तीव्र करण्याचे आदेश दिले आहेत.